बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल) साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) एनओसी न मिळाल्याने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद हॅरिस मायदेशी परतला आहे.
मोहम्मद हॅरिस (Mohammad Harris) गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये असून तो बीपीएलमध्ये चट्टोग्राम चॅलेंजर्सचा भाग होता. परंतु पीसीबीला कळाले की, हॅरिसने जुलै 2023 ते जुलै 2024 या कालावधीत निर्धारित अटींनुसार आधीच दोन परदेशी टी-20 लीग खेळल्या आहेत. हॅरिसने गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात लंका प्रीमियर लीग आणि ग्लोबल टी20 कॅनडा खेळली होती.
हॅरिसने सांगितले की, स्पर्धेच्या तयारीसाठी तो आधीच बांगलादेशला पोहोचला होता पण नंतर लक्षात आले की, त्याला एनओसी मिळू शकणार नाही.
हॅरिस म्हणाला, “माझी काळजी घेतल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल चट्टोग्राम संघ व्यवस्थापन आणि बीसीबी (बांगलादेश क्रिकेट बोर्ड) यांचे आभार. बांगलादेशातील माझ्या चाहत्यांना माझ्या कामगिरीने चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने मी वेळेवर येथे आलो. पण दुर्दैवाने मला एनओसी मिळू शकली नाही. त्यामुळे मी खेळू शकणार नाही. मला माहित आहे की, माझ्या संघाला माझी गरज आहे पण मला आशा आहे की, पुढच्या वर्षी मी नक्कीच बीपीएल खेळेन.”
या मोसमात चट्टोग्राम चॅलेंजर्सने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर दुसऱ्या सामन्यात त्यांचे विजयाचे खाते उघडले. मात्र, हॅरिस याच्या बदलीची घोषणा त्यांनी अद्याप केलेली नाही. (Mohammed Harris had to quit BPL due to PCB’s rejection of NOC)
हेही वाचा
केएस भरतने शतक केले भगवान रामाला समर्पित, शतकाच्या खास सलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
शोएब अख्तरचं विराटबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘तो आमच्या वेळी असता तर…’