भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 1 कोटी रुपये न दिल्याने शमीला ही धमकी मिळाली आहे. या भारतीय क्रिकेटपटूला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे उघड होताच अमरोहा क्राइम ब्रांचच्या पथकाने चौकशी सुरू केली आहे.
धमकी मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अमरोहा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. शमीने सांगितले की त्याला पहिला ई-मेल काल (4 मे) रोजी संध्याकाळी आला होता. त्यानंतर, दुसरा ई-मेल आज (5 मे) रोजी सोमवारी सकाळी आला आहे. शमीचा भाऊ मोहम्मद हसीबने पोलिसांना याबद्दल लेखी माहिती दिली आहे.
मोहम्मद शमीने अमरोहा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, अमरोहा क्राइम ब्रांचच्या पथकाने तपास सुरू केला आहे. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, कर्नाटकातील प्रभाकर नावाच्या व्यक्तीने मोहम्मद शमीला एक मेल पाठवला आहे, ज्यामध्ये 1 कोटी रुपये न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मोहम्मद शमी सध्या आयपीएल 2025 या स्पर्धेत व्यस्त आहे. शमी हा सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचा भाग आहे. या आयपीएलमध्ये हैदराबाद संघाची कामगिरी काही खास राहिलेली नाही. एसआरएचने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, त्यापैकी 7 सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला आहे.