भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच उपकर्णधार रोहित शर्माबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत संवाद साधला. यामध्ये त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात खराब काळाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मी त्यादरम्यान ३वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
खरंतर २०१८पासून शमीच्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. त्याची पत्नी हसीन जहांने (Hasin Jahan) त्याच्यावर कौटुंंबिक अत्याचार करण्याचा आरोप केला होता. त्यावेळी तो खूप तणावात होता. तरी त्यानंतर शमीने परिस्थिती सांभाळली. तो म्हणाला की, त्यावेळी तो केवळ आपल्या परिवारामुळे या सर्व कठीण परिस्थितींचा सामना करू शकला.
शमी पुढे म्हणाला की, “मी २०१५ विश्वचषकात जखमी झाला होतो, तेव्हा मला पूर्णपणे व्यवस्थित होण्यासाठी तब्बल १८ महिन्यांचा कालावधी लागला होता. मी पुन्हा खेळायला सुरुवात केल्यानंतर मला वैयक्तिक समस्यांचा सामना करावा लागला होता. मला वाटत होते की, जर माझ्या परिवाराने मला मदत केली नसती तर मला या संकटातून बाहेर पडता आले नसते. यादरम्यान मी ३वेळी आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केला होता.”
“त्यादरम्यान माझ्यासोबत आठवडाभर दिवस रात्र कोणीतरी उपस्थित असायचे. मी मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. त्यावेळी माझे कुटुंब माझ्याबरोबर होते. जेव्हा तुमचे कुटुंंब तुमच्याबरोबर असते तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकता. त्यावेळी जर माझे कुटुंब माझ्याबरोबर नसते तर माझ्याकडून चूकीच काहीतरी घडले असते,” असेही शमी यावेळी म्हणाला.
या लाईव्ह चॅटदरम्यान शमी (Mohammed Shami) आणि रोहितने (Rohit Sharma) क्रिकेटबद्दल खूप चर्चा केली. शमीने रोहितला त्याच्या सर्वोत्तम खेळीबद्दल तसेच त्याच्या द्विशतकी खेळीबद्दलही अनेक प्रश्न विचारले.
शमीने भारताकडून आतापर्यंत एकूण ४९ कसोटी सामने, ७७ वनडे सामने आणि ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २७.३६ च्या सरासरीने १८० विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडेत त्याने २५.४२ च्या सरासरीने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०त त्याने ३१.८३च्या सरासरीने एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहित जगातील गोलंदाजांना धु- धु धुतो, परंतु या दोन गोलंदाजांना जाम घाबरतो
-जर गल्ली क्रिकेट खेळला असला तर तुम्हाला शंभर टक्के माहित असणार हे २० नियम
-सनी लियाॅनबरोबर डिजे ब्रावोचा लाईव्ह डान्स, सोशल मीडियावर झाली एकच चर्चा