भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याला बीसीसीआयनेही खेळाडूंच्या वार्षिक करारामधून वगळले आहे. पण आता त्याने त्याच्या पत्नीबद्दल काही खुलासे केले आहेत.
शमीची पत्नी हसीनचा हा दुसरा विवाह आहे. तिचा पहिला विवाह एस के सैफुद्दीनबरोबर झाला होता. तिला तिच्या पहिल्या लग्नापासून दोन मुलीही आहेत. तिची मोठी मुलगी सध्या १० वी मध्ये तर दुसरी मुलगी ६ वी मध्ये शिकत आहे. पण तिचा त्यानंतर सैफुद्दीनबरोबर घटस्फोट झाला होता.
आता शमीने असे म्हटले आहे की त्याला हसीनच्या पहिल्या लग्नाविषयी काहीच माहित नव्हते. त्याचबरोबर तो म्हणाला आहे की हसीनने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सांगितले की तिच्या पहिल्या लग्नाच्या दोन्ही मुली तिच्या मृत बहिणीच्या मुली आहेत.
त्याने NewsX ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही जेव्हा लग्न केले तेव्हा मला तिच्या पहिल्या लग्नाविषयी माहित नव्हते. पण हळूहळू तिने मला सांगायला सुरुवात केली. तिने सांगितले होते की त्या मुली तिच्या मृत बहिणीच्या आहेत. आतापर्यंत माझे कुटुंब असेच समजत होते की तिच्या बहिणीच्याच त्या मुली आहेत.”
शमीच्या पत्नीने त्याच्यावर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने हसीन बरोबर २०१४ मध्ये लग्न केले होते.