भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इतक्या दिवसांच्या अडचणीनंतर आज एक चांगली बातमी मिळाली आहे. आज बीसीसीआयने त्याला मॅच फिक्सिंगच्या आरोपातुन निर्दोष असल्याची पावती दिली आहे आणि अखेर त्याला खेळाडूंसाठी असलेल्या वार्षिक करारातही स्थान दिले आहे.
शमीवर त्याची पत्नी हसीन जहाँने विवाह बाह्य संबंध असल्याचा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केले होते. तसेच तिने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर घरगुती हिंसाचाराचेही आरोप केले होते.
या आरोपानंतर लगेचच बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार स्थगित केला होता. पण आता त्याच्यावर असलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाची चौकशी झाल्यानंतर बीसीसीआयने त्याला निर्दोष घोषित केले. तसेच त्याला खेळाडूंच्या वार्षिक कराराच्या B श्रेणीतही स्थान दिले आहे. त्यामुळे आता त्याला या श्रेणीसाठी असलेले ३ कोटी रुपये मिळतील.
याबद्दल बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीने दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष नीरज कुमार यांना शमीच्या विरोधात मॅच फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती.”
“नीरज कुमार यांनी या प्रकरणाचा गोपनीय अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या समितीकडे सुपूर्त केला आहे. या अहवालाच्या निष्कर्षावरून सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी कलमानुसार पुढे कोणतीही कारवाई करणार नाही. त्यामुळेच बीसीसीआयने शमीचा वार्षिक कराराच्या B श्रेणीत समावेश केला आहे.”
याआधीच शमीचा आयपीएलमधील सहभागही निश्चित करण्यात आला आहे. तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून यावर्षी आयपीएलमध्ये खेळणार आहे.