भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या त्याची पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोपांमुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर झालेल्या या आरोपांमुळे त्याला बीसीसीआयने खेळाडूंसाठी असलेल्या वार्षिक करारातूनही वगळले आहे.
हसीनने शमीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा तसेच मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. याबद्दल आता हसीनने शमीविरोधात केलेल्या आरोपांची कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या बीसीसीआयच्या समितीचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे पाठवले आहेत.
याबद्दल तिचे वकील झाकीर हुसेन यांनी सांगितले की ” आम्ही लालबाजार पोलीस चौकीत (कोलकाता पोलीस मुख्यालय) नोंदवलेल्या तक्रारींचे तपशील आणि एफआयआरची प्रत विनोद राय यांना पाठवली आहे.”
याबरोबरच हसीनने म्हटले आहे की शमीने मोहम्मद भाई या उद्योगपतीच्या आग्रहाखातर अल्शीबा नावाच्या पाकिस्तानमधील मुलीकडून पैसे घेतले आहेत. तसेच तिने शमी आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात घरगुती हिंसेचीही तक्रार केली आहे.
विनोद राय यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी समितीचे अध्यक्ष नीरज कुमार यांना शमीविरोधात नोंदवल्या गेलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने हसीन बरोबर २०१४ मध्ये लग्न केले होते.