गोवा: एटीके मोहन बागानने बंगलोर एफसीवर २-० अशी मात करताना हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील प्ले-ऑफच्या रेसमधील आव्हान कायम राखले. दोन बरोबरीनंतरचा हा त्यांचा पहिला विजय आहे.
पीजेएन स्टेडियम, फातोर्डावर झालेल्या संडे स्पेशल सामन्यात गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असलेल्या मोहन बागानला विजय आवश्यक होता. त्यांच्या मदतीला लिस्टन कोलॅको धावून आला. मध्यंतराला काही सेकंद शिल्लक असताना अतिरिक्त वेळेत लिस्टन कोलॅकोने अप्रतिम गोल करताना क्लबला आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे बागानच्या फुटबॉलपटूंचा आत्मविश्वास उंचावला. मात्र, ८५व्या मिनिटाला मनवीर सिंगने त्यात भर घातली.
केरला ब्लास्टर्स एफसी आणि ओदिशा एफसी यांच्याविरुद्धच्या बरोबरीनंतर मोहन बागानची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, रविवारी खेळ उंचावताना अव्वल चार संघांत स्थान राखण्यासह बाद फेरीचे आव्हान कायम ठेवले. बंगलोर एफसीच्या विजयासह एटीके मोहन बागानचे १८ सामन्यांतून ३४ गुण झालेत. संपूर्ण तीन गुण वसूल करताना त्यांनी जमशेदपूर एफसीला गाठले. समान गुण असले तरी सरस गोलफरकाच्या आधारे जमशेदपूर दुसऱ्या स्थानी कायम आहे.
रविवारच्या निकालानंतर ताज्या गुणतालिकेत उपांत्य फेरी निश्चित केलेला हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागान यांच्यात आता केवळ एका गुणाचा फरक आहे. टॉपला असलेल्या हैदराबाद एफसी आणि एटीके मोहन बागानचे आणखी दोन सामने शिल्लक असल्याने आठव्या हंगामामध्ये अव्वल नंबर पटकावण्यासाठी चुरस आहे.
मागील लढतीत ओदिशा एफसीवर निसटती मात करताना बंगलोरने बाद फेरीच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, मोहन बागानने त्यांना जवळपास बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बंगलोरचे १९ सामन्यांनंतर २६ गुण झालेत. साखळीतील शेवटचा सामना जिंकला तरी जमशेदपूर एफसी, मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्सचे अद्याप काही सामने शिल्लक असल्याने बंगलोरचे बाद फेरीचे आव्हान संपल्यात जमा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: ईस्ट बंगालसह नॉर्थ ईस्ट युनायटेडमध्ये शेवटचे स्थान टाळण्यासाठी स्पर्धा
केरला ब्लास्टर्सचा चेन्नईयन एफसीवर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला राखले कायम
जमशेदपूरचा विजयी चौकार; नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटती मात