सध्या न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज कामिंदू मेंडिस पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीसाठी धावून आला.
श्रीलंकेच्या गाले क्रिकेट स्टेडियमवर आजपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू झाला. यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी 106 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर कामिंदू मेंडिसनं प्रथम अँजेलो मॅथ्यूज आणि नंतर कुसल मेंडिससह श्रीलंकेच्या डावाची धुरा सांभाळली. कामिंदूनं शतकी खेळी करत श्रीलंकेची धावसंख्या 260 च्या पुढे नेली.
कामिंदूच्या कारकिर्दीतील ही केवळ सातवी कसोटी आहे. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या सातही कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा धावा केल्या आहेत. यासह त्यानं पदार्पणापासून सलग कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा करण्याच्या पाकिस्तानच्या सौद शकीलच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. सौद शकीलनं गेल्या वर्षी जुलैमध्ये हा विश्वविक्रम केला होता. शकीलनं त्यावेळी भारताचे सुनील गावसकर, वेस्ट इंडिजचे बेसिल बुचर, पाकिस्तानचा सईद अहमद आणि न्यूझीलंडचा बर्ट सटक्लिफ यांचे विक्रम मोडीत काढले होते. या चौघांनी पदार्पण केल्यापासून सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या या खेळीत मेंडिसनं कसोटी क्रिकेटमध्ये 800 धावांचा आकडाही गाठला. कामिंदूनं 2022 मध्ये गालेच्या मैदानावरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्यानं 61 धावांची खेळी खेळली होती. मार्च 2024 मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे 102, 164, नाबाद 92 आणि 9 धावांची खेळी खेळली. यानंतर कामिंदूनं इंग्लंड दौऱ्यावर आपला उत्कृष्ट फॉर्म जारी ठेवला. त्यानं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावली.
कामिंदूचा हा रेकॉर्ड खास आहे, कारण पाकिस्तानच्या सौद शकीलनं पहिल्या सात कसोटी सामन्यांमध्ये केलेल्या धावा फक्त आशियाई खेळपट्ट्यांवर होत्या. परंतु कामिंदूनं यापैकी तीन कसोटी सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत.
हेही वाचा –
आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियमांमध्ये बदल व्हायला हवेत? दोन दिग्गजांचं मोठं वक्तव्य
भारतीय कसोटी संघाच्या यशात कोणाचा वाटा मोठा? गंभीर-विराटनं यांना दिलं श्रेय
आयसीसी टी20 क्रमवारीत मोठा उलटफेर, आयपीएलमधील फ्लॉप खेळाडूची अव्वल स्थानी झेप