टी२० क्रिकेट स्पर्धेपैकी एका मोठ्या स्पर्धेचा म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा रणसंग्राम आता लवकरच सुरु होणार आहे. आयपीएलचा हा हंगाम ९ एप्रिलपासून चेन्नई येथे सुरू होईल. हंगाम सुरू होण्यास आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिल्याने खेळाडू जोमाने सराव करीत आहेत.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अनेक मोठ्या विक्रमांची नोंद झाली आहे. या लेखात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एका डावात ५० पेक्षा अधिक धावा झळकावणाऱ्या फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.
डेव्हिड वॉर्नर (५२ वेळा)
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर हा एका डावात ५० पेक्षा अधिक धावा ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी आहे. वॉर्नरने २००९ ते २०२० यादरम्यान दिल्ली डेअरडेव्हिल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व करताना ५२ वेळा पन्नाशी पार केली. यात ४८ अर्धशतके आणि ४ शतकांचा समावेश आहे.
विराट कोहली(४४ वेळा)
या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली द्वितीय स्थानी आहे. विराटने २००८ पासून केवळ आरबीचेच प्रतिनिधित्व केले असून, यादरम्यान त्याने ४४ वेळा अर्धशतकापेक्षा जास्त धावा केल्या असून, यात ३९ अर्धशतके आणि ५ शतकांचा समावेश आहे.
शिखर धवन (४३ वेळा)
भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. धवनने आत्तापर्यंत पाच वेगवेगळ्या आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले असून त्यामध्ये डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेविल्स, सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे. धवनने आत्तापर्यंत १७६ सामने खेळताना ४३ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची वेस ओलांडली आहे. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ४१ अर्धशतके व २ शतके आली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“असे खूप भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना विदेशी फ्रँचायझी टी२० लीगमध्ये खेळायचे आहे”, या दिग्गजाचा दावा
डेव्हिड वॉर्नरला पडला प्रश्न, क्वारंटाईनमध्ये काय करावे? रोहित शर्माने दिले ‘भन्नाट’ उत्तर
लग्नापूर्वी केलेल्या विधानावर किंग कोहलीची पत्नी अनुष्काची पल्टी? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल