महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून महाराष्ट्र प्रीमियर लीगची जय्यत तयारी सुरू आहे. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. या हंगामाच्या सुरुवातीआधी एप्रिल महिन्यात खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. या लिलावात सर्वात महागडा ठरलेल्या पाच खेळाडूंविषयी आपण जाणून घेऊया.
मागील देशांतर्गत हंगामात विदर्भ सोडून महाराष्ट्र क्रिकेट संघाशी जोडलेला अनुभवी वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी (Rajnish Gurbani) याला या लिलावात मोठी मागणी असल्याचे दिसून आले. विदर्भ संघाला दोन वेळा रणजी ट्रॉफी विजेता बनवण्यात रजनीश याची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या याच अनुभवामुळे त्याच्यावर मोठी बोली लागली. सातारा वॉरियर्स संघाला मागे टाकत राहुल त्रिपाठी याच्या नेतृत्वातील पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने त्याच्यावर 5 लाख 20 हजारांची सर्वात मोठी बोली लावली. त्यामुळे तो यंदा प्रथमच एमपीएलमध्ये उतरताना दिसेल.
टेनिस क्रिकेट जगतातील मोठे नाव असलेल्या विवेक शेलार (Vivek Shelar) याने मागील वर्षी एमपीएलमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच हंगामात पुणेरी बाप्पा संघासाठी तो महत्त्वाचे बळी मिळवण्यात यशस्वी ठरलेला. त्यानंतरही पुणे संघाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. एमपीएल 2025 लिलावात सामील झाल्यानंतर त्याला सातारा वॉरियर्स व रायगड रॉयल्स यांनी आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेर सातारा संघाने 3 लाख 40 हजार रुपयांची बोली लावत आपल्या गोलंदाजी विभागाचा प्रमुख बनवले.
छत्रपती शिवाजी किंग्स संघ एमपीएल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर संघाचा कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) हा लिलावात सहभागी झालेला. दुसऱ्या हंगामातील शतकवीर असलेल्या मूर्तझा याच्या फलंदाजी कौशल्यामुळे त्याला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक संघ इच्छुक होते. परंतु, ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील पुणेरी बाप्पा संघाने 3 लाख 20 रुपयांची सर्वात मोठी बोली लावली. त्यामुळे मुर्तझा आता पुणे संघासाठी या हंगामात सलामीला येताना दिसेल.
डावखुरा युवा आणि स्टायलिश फलंदाज म्हणून नाव कमावत असलेला हर्ष मोगावीरा (Harsh Mogaveera) हा अनेक संघांच्या रडारवर होता. पुणे व नाशिक संघाने त्याच्यावर सुरुवातीपासून बोली लावली. मात्र, पहिल्या दोन हंगामात फारशी चमकदार कामगिरी न करू शकलेल्या रायगड रॉयल्स संघाने त्याच्यावर अधिक विश्वास दाखवला. तीन लाख रुपयांची बोली लागल्याने तो एमपीएल 2025 मध्ये रायगड संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
भारताच्या अंडर 19 संघाच्या प्रतिनिधित्व केलेला व महाराष्ट्र क्रिकेटमधील भविष्यातील सितारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवन शहा (Pavan Shah) याला पुणेरी बाप्पा संघाने रिलीज केले होते. सलामीवीर असलेल्या पवनसाठी स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या सातारा वॉरियर्स संघाने सर्वोच्च बोली लावली. पवन 1 लाख 40 हजारांच्या बोलीमुळे एमपीएल 2025 मध्ये सातारा संघासाठी सलामीला उतरताना दिसू शकतो.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीएल 2025 व डब्ल्यूएमपीएल या दोन्ही स्पर्धा गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. एमपीएलची सुरुवात 4 जूनपासून होईल. या दोन्ही स्पर्धांसाठी चाहत्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. हे सामने ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar तर टेलिव्हिजनवर Star Sports 2 वर पाहता येणार आहेत. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar And Star Sports 2 TV Channel)






