अहमदाबाद। सोमवारी (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब किंग्सं संघाला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ च्या २१ व्या सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यादरम्यान पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर एक नकोसा विक्रमही झाला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी ८ षटकांच्या आतच तीन विकेट्स गमावल्या होत्या. यात युनिवर्स बॉस असे नावलौकिक मिळवलेल्या ख्रिस गेलच्या विकेटचाही समावेश होता. विशेष म्हणजे गेल या सामन्यात पहिलाच चेंडू खेळताना शुन्यावर बाद झाला. त्याला शिवम मावीने यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे गेल आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदाच पहिल्या चेंडू खेळताना शुन्यावर बाद झाला.
टी२० क्रिकेट प्रकारात गेलची शुन्यावर बाद होण्याची ही एकूण २९ वी वेळ आहे. त्यामुळे गेलच्या नावावर आता टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम झाला आहे. तो ड्वेन स्मिथला या नकोशा विक्रमाच्या यादीत मागे टाकत अव्वल क्रमांकावर आला आहे. स्मिथ २८ वेळा टी२० क्रिकेटमध्ये शुन्यावर बाद झाला आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणारे क्रिकेटपटू
२९ – ख्रिस गेल (४२२ सामने)
२८ – ड्वेन स्मिथ (३३७ सामने)
२७ – उमर अकमल (२६० सामने)
२७ – शाहिद आफ्रिदी (३२६ सामने)
२६ – कमरान अकमल (२७० सामने)
२६ – लेंडल सिमन्स (२६३ सामने)
टी२० क्रिकेटमधील हे विक्रम आहेत गेलच्या नावावर
टी२० क्रिकेटमध्ये गेलने सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रम जरी केला असला तरी त्याच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक अर्धशतके, सर्वाधिक षटकार आणि चौकार मारण्याचे विश्वविक्रमही आहेत. गेलने त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीत ४२२ सामने खेळताना ३७.९१ च्या सरासरीने १३८३९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २२ शतकांचा आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने त्याच्या टी२० क्रिकेट कारकिर्दीत १०६६ चौकार आणि १०१४ षटकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ : वाह रे पठ्ठ्या! राहुल त्रिपाठीने चक्क कोलांटीउडी मारत घेतला झेल
लाजवाब! रवी बिश्नोईने डोळे दिपवून टाकणारा झेल घेत सुनील नारायणला धाडले शुन्यावर माघारी, पाहा व्हिडिओ