पुणे । शहरासह तालुका स्तरावरील गुणवान व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात गौतमी नाईक हि सर्वात महागडी खेळाडू ठरली असून शिवनेरी पँथर्स संघाने तिला 20000 पॉईंट्सला विकत घेतले आहे.
रविराज हॉटेल येथे शानदार समारंभात व उत्कंठावर्धक वातावरणात गुणवंत खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या एचपी सुपरकिंग्स, शिवनेरी पँथर्स, सिंहगड स्टार्स, रायगड रॉकर्स, तोरणा टायगर्स या 5 संघांमध्ये 90 खेळाडूंपैकी एकूण 70खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.
या बोली प्रकियेत एचपी सुपरकिंग्सचे हेमंत पाटील, शिवनेरी पँथर्सच्या श्रेया पाटील, सिंहगड स्टार्सच्या चैतन्या पाटील, रायगड रॉकर्सच्या प्रमिला पाटील आणि तोरणा टायगर्सचे जनादेश प्रायव्हेट लिमिटेड हे संघमालक उपस्थित होते.
अष्टपैलू खेळाडू गौतमी नाईकला शिवनेरी पँथर्स संघाने सर्वाधिक बोली लावून विकत घेतले. गौतमी नाईकनंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची बोली श्वेता खटाळ व कश्मिरा शिंदेला मिळाली. श्वेताला सिंहगड स्टार्स संघाने, तर कश्मिरा शिंदेला सिंहगड स्टार्स संघाने 19500 पॉईंट्सच्या बोलीवर विकत घेतले. सायली लोणकर या खेळाडूलाही 18500 पॉईंट्सच्या बोलीवर शिवनेरी पँथर्सने विकत घेतले.
लिलावाबाबत अधिक माहिती देताना हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले कि, गेली 12 वर्षे हेमंत पाटील प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येत आहे.
पण यावेळेस महिला खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शनच्या सहयोगाने पुण्यात पहिल्यांदाच या महिला लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत 5 संघांमध्ये 20 सामने होणार आहेत. लिलावात खेळाडू घेण्यासाठी प्रत्येक फ्रँचायजीला 1 लाख पॉईंटची खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली होती.
स्पर्धेला 26मे पासून सुरुवात होणार असून हि स्पर्धा व्हिजन क्रिकेट अकादमी येथील मैदानावर होणार आहे. स्पर्धेत 1 लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून विजेत्या संघाला 51 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.