---Advertisement---

एकाच कसोटी सामन्यात शतक-अर्धशतक; एक-दोन नव्हे तब्बल ११ वेळा ‘यांनी’ केलाय हा पराक्रम

On: रविवार, जानेवारी 10, 2021 10:10 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आज (१० जानेवारी) चौथा दिवस आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने २ बाद १०५ धावांपासून पुढे खेळायला सुरु केली असून दुसऱ्या सत्रापर्यंत ४०६ धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावातील झुंजार शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा धुरंधर स्टिव्ह स्मिथने दुसऱ्या डावातही ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह स्मिथने एका खास विक्रमाची आपल्या पारड्यात भर पाडली आहे.

तब्बल ११ वेळा एकाच सामन्यात शतक आणि अर्धशतक

तिसऱ्या दिवसाखेर संघसहकारी मार्नस लॅब्यूशानेसोबत मिळून स्मिथने अर्धशतकी भागिदारी रचली होती. या भागिदारीला शतकी खेळीच्या पार नेण्याच्या दृष्टीने दोघेही चांगली फलंदाजी करत होते. मात्र भारताचा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने सबस्टीट्यूट यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या हातून लॅब्यूशानेला झेलबाद करत त्यांची भागिदारी मोडली.

मात्र स्मिथने पुढे संघाचा डाव सावरत १६७ चेंडू खेळत ८१ धावा केल्या. दरम्यान एक षटकार आणि ८ चौकार त्याने ठोकले. अखेर ६७.४ षटकात भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने त्याला पायचित करत माघारी धाडले.

तत्पुर्वी पहिल्या डावात स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. २२६ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने १३१ धावांची शतकी खेळी स्मिथने केली होती. यासह एका कसोटीत सामन्यात शतक आणि ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम स्मिथने केला.

अशाप्रकारे स्मिथने कसोटी कारकिर्दीत ११ वेळा एका सामन्यात शतक आणि ५० पेक्षा जास्त धावा करत जॅक्स कॅलिस यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकाचे माजी क्रिकेटपटू कॅलिस यांनीही कसोटी कारकिर्दीत ११ वेळा एका सामन्यात शतक आणि अर्धशतकीपार धावसंख्या उभारली होती. स्मिथ आणि कॅलिसव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही हा १० वेळा कसोटीत हा पराक्रम केला होता.

ऑस्ट्रेलियाचे भारताला ४०७ धावांचे आव्हान –

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. त्यामुळे पहिल्या डावातील ९४ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने ४०७ धावांचे आव्हान भारतीय संघासमोर ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीन(८४), स्टिव्ह स्मिथ (८१) आणि मार्नस लॅब्यूशाने (७३) यांनी अर्धशतके झळकावली.

भारताकडून आर अश्विन आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

“उर्वरित सामन्यात आम्हाला जडेजाची उणीव भासेल”, पुजाराने दिली प्रतिक्रिया

भावा तो खरचं आऊट झाला ना! फलंदाजाला स्वतः धावबाद करूनही खेळाडूला बसेना विश्वास, पाहा व्हिडिओ

हे तर आठवे आश्चर्य! चक्क मांजरेकरांनी केले जडेजाचे कौतुक, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---