युवा फलंदाज शुबमन गिलनं न्यूझीलंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर शानदार फलंदाजी करत एक विशेष कामगिरी केली आहे. तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला. त्यानं या बाबतीत भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला मागे टाकलं. पुजारानं भारतासाठी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 62 डावांमध्ये 1769 धावा केल्या आहेत. शुबमन गिलच्या नावे आता 1799 धावा झाल्या आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कर्णधार रोहित शर्माच्या नावे आहे. ‘हिटमॅन’नं स्पर्धेच्या 63 डावांत सर्वाधिक 2674 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. किंग कोहलीनं 69 डावात 2426 धावा केल्या आहेत. सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानं 50 डावात 1933 धावा केल्या आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय
रोहित शर्मा – 2674 धावा (63 डाव)
विराट कोहली – 2426 धावा (69 डाव)
रिषभ पंत – 1933 धावा (50 डाव)
शुबमन गिल – 1799 धावा (53 डाव)
चेतेश्वर पुजारा – 1769 धावा (62 डाव)
शुबमन गिलनं मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी करत 90 धावा केल्या. त्यानं आपल्या 146 चेंडूच्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तो डॅरिल मिचेलच्या हाती झेलबाद झाला. फिरकीपटू एजाज पटेलनं त्याची विकेट घेतली. गिलच्या या खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात 263 धावा केल्या. न्यूझीलंडनं आपल्या पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात 28 धावांची आघाडी मिळाली. विशेष म्हणजे, या मालिकेत भारतीय संघानं प्रथमच आघाडी घेतली आहे.
हेही वाचा –
रिषभ पंतचा मोठा धमाका, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू!
भारताच्या 38 वर्षीय खेळाडूवर सीएसकेची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली
रिषभ पंतचं मुंबईत विक्रमी अर्धशतक, न्यूझीलंडविरुद्ध केला मोठा पराक्रम