दुबई। पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा ३२ वा सामना पार पडला. या सामन्यात पंजाबकडून अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. मात्र, त्याच्या नावावर एक नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याने एविन लुईस, लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी आणि चेतन साकारिया यांच्या विकेट्स घेतल्या.
नकोसा विक्रम झाला नावावर
अर्शदीपने ५ विकेट्स घेताना ३२ धावा देखील प्रतिस्पर्धी संघाला दिल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देऊन ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या नकोशा यादीत जयदेव उनाडकटला मागे टाकले आहे. उनाडकटने २०१७ साली सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५ विकेट्स घेताना ३० धावा दिल्या होत्या.
असे असले तरी अर्शदीप हा सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. सोमवारी त्याने जेव्हा ५ विकेट्स घेतल्या, तेव्हा त्याने वय २२ वर्षे २२८ दिवस होते. या यादीत त्याने इशांत शर्माला मागे टाकले. इशांतने आयपीएलमध्ये कोची टस्कर्स केरला विरुद्ध २२ वर्षे २३७ दिवस इतके वय असताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.
या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा जयदेव उनाडकट आहे. त्याने २०१३ साली २१ वर्षे २०४ दिवस वय असताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ अल्झारी जोसेफ आहे. त्याने २०१९ साली सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १२ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. हे आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन देखील आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा देऊन ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज
३२ धावा – अर्शदीप सिंग (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२१)
३० धावा – जयदेव उनाडकट (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१७)
२७ धावा – हर्षल पटेल (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२१)
२५ धावा – जयदेव उनाडकट (विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१३)
२५ धावा – दिमित्री मस्करेन्हास (विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया, २०१२)
पंजाबचा थरारक विजय
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकांत ४ बाद १८३ धावाच करता आल्या. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर, केएल राहुलने ४९ धावा केल्या. तसेच एडेन मार्करमने नाबाद २६ धावा केल्या आणि निकोलस पूरनने ३२ धावा केल्या. राजस्थानकडून कार्तिक त्यागीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच चेतन साकारिया आणि राहुल तेवातियाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –






