आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ प्रकार आहेत. कसोटी, वनडे आणि टी२०. टी२० क्रिकेट प्रकार आल्यामुळे वनडेतही खेळण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. तसं पाहिलं, तर गोलंदाजांची भूमिका सर्वात महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यांच्यावर विरोधी संघाच्या फलंदाजांना बाद करत त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याची जबाबदारी असते.
असे असले तरी नियमांमधील बदल आणि क्रिकेट प्रकार लहान झाल्यामुळे फलंदाजांच्या मानसिकतेतही बदल झाला आहे. आता खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरत आहे आणि बाऊंड्रीलाईनही (सीमारेषा) लहान असते. यामुळे गोलंदाजांचे नुकसान होते आणि फलंंदाज सहजपणे मोठ-मोठे शॉट्स खेळत धावा काढतात.
फलंदाजांला बाद करण्याचा गोलंदाजदेखील प्रयत्न करतात. परंतु यामुळे त्यांच्याकडून अधिक धावा दिल्या जातात. वनडेतील एका सामन्यात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मिक लुईसच्या (Mick Lewis) नावावर आहे. लुईसने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना १० षटकांमध्ये तब्बल ११३ धावा दिल्या होत्या.
भारताकडूनही २ गोलंदाजांनी वनडेत १०० अधिक धावा दिल्या आहेत. याव्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांनी खराब गोलंदाजीही केली आहे.
या लेखात आपण त्या गोलंदाजांचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी एका वनडे सामन्यात सर्वाधिक धावा दिल्या आहेत.
वनडे सामन्यात सर्वाधिक धावा देणारे ५ भारतीय गोलंदाज- Most Runs given in an ODI Innings by Indian Bowler
१. भुवनेश्वर कुमार
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५वा वनडे सामना, २०१५
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात २०१५ मध्ये ५ सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात आली होती. मालिकेतील शेवटचा वनडे सामना २५ ऑक्टोबर २०१५मध्ये मुंबई येथे खेळण्यात आला होता. दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ४३८ धावांचे भलामोठे आव्हान उभे केले होते. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना क्विंटन डी कॉक, फाफ डू प्लेसिस आणि एबी डिविलियर्सने शतकी खेळी केली होती.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ४३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २२४ धावांवर सर्वबाद झाला होता.
तसं पाहिलं, तर भारताकडून खेळताना प्रत्येक गोलंदाजाने खराब कामगिरी केली होती. भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshar Kumar) १० षटके गोलंदाजी करताना केवळ एक विकेट घेत तब्बल १०६ धावा दिल्या होत्या. भारताकडून टाकण्यात आलेली सर्वात महागडी गोलंदाजी ठरली होती. हा लाजिरवाणा विक्रम आताही भुवनेश्वरच्याच नावावर आहे. वनडे इतिहासातील हा चौथा महागडा तर भारताकडून वनडेतील सर्वात महागडा स्पेल आहे.
२. विनय कुमार
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ७ वा वनडे सामना, २०१३
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २०१३ साली ७ सामन्यांची वनडे मालिके खेळण्यात आली होती. मालिकेतील शेवटचा वनडे सामना २ नोव्हेंबर, २०१३ रोजी खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) द्विशतकी खेळीच्या दमावर ६ बाद ३८३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध चांगली खेळी केली होती. परंतु त्यांचा संघ ३२६ धावांवर सर्वबाद झाला होता. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियावर ५७ धावांनी विजय मिळविला होता.
त्या सामन्यात भारताकडून विनय कुमारने (Vinay Kumar) ९ षटके गोलंदाजी करताना एक विकेट घेत १०२ धावा दिल्या होत्या. विनय वनडेत भारताकडून १०० पेक्षा अधिक धावा देणारा पहिला गोलंदाज बनला होता. पुढे दोनच वर्षांनी भुवीने हा नकोसा विक्रम मोडलाच. यानंतर विनयकुमार भारताकडून एकही वनडे सामना खेळू शकला नाही.
३. भुवनेश्वर कुमार
विरुद्ध न्यूझीलंड, ३रा वनडे सामना, २०१७
भारत आणि न्यूझीलंड संघात ३ सामन्यांची वनडे मालिका २०१७ मध्ये खेळण्यात आली होती. या मालिकेतील शेवटचा वनडे सामना २९ ऑक्टोबर, २०१७ मध्ये कानपूर येथे खेळण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३३७ धावांचे आव्हान उभे केले होते.
न्यूझीलंडचा संघ विजयाच्या खूप जवळ आला होता. परंतु त्यांचा डाव ७ बाद ३३१ धावांवरच संपुष्टात आला आणि त्यामुळे ६ धावांनी सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्या सामन्यात भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वरने वनडेत तिसऱ्यांदा सर्वात खराब गोलंदाजी केली होती. त्याने १० षटके गोलंदाजी करताना १ विकेट घेत सर्वाधिक ९२ धावा दिल्या होत्या.
४. झहीर खान
विरुद्ध श्रीलंका, पहिला वनडे सामना, २००९
भारत आणि श्रीलंका संघात २००९मध्ये ५ सामन्यांची वनडे मालिके खेळण्यात आली होती. मालिकेतील पहिला सामना राजकोट येथे, १५ डिसेंबर, २००९मध्ये खेळण्यात आला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना विरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) शतकी खेळीच्या सहाय्याने ७ बाद ४१४ धावा केल्या होत्या.
भारताने दिलेल्या ४१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने ८ बाद ४११ धावाच केल्या होत्या. अशाप्रकारे श्रीलंका संघ ३ धावांनी पराभूत झाला होता.
त्या सामन्यात भारताकडून २ गोलंदाजांनी तब्बल ८० पेक्षाही अधिक धावा दिल्या होत्या. त्यात झहीर खानचा (Zaheer Khan) समावेश आहे. त्याने १० षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता ८८ धावा दिल्या होत्या. तर आशिष नेहराने १० षटकांत ८१ धावा दिल्या होत्या. असे असले तरी भारताने तो सामना जिंकला होता. तसेच त्याच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाचे काही नुकसान झाले नव्हते.
५. युजवेंद्र चहल
विरुद्ध इंग्लंड, विश्वचषक २०१९
इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकात बर्मिंगहममध्ये भारत आणि इंग्लंड संघात सामना खेळण्यात आला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडने दिलेल्या ३३८ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना भारताने केवळ ५ बाद ३०६ धावाच केल्या होत्या. तसेच ३१ धावांनी हा सामना गमावला होता.
त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना खास कामगिरी करता आली नव्हती. त्यात युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) सर्वात खराब गोलंदाजी केली होती. त्याने १० षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता ८८ धावा दिल्या होत्या.
वाचनीय लेख-
-जेव्हा क्रिकेटमधील सर्वात सभ्य गृहस्थाच्या घरात शिरते अनोळखी मुलगी
-असे क्रिकेटर होणे नाही! जखमी अवस्थेत देशासाठी मैदानावर उतरलेले ५ दिग्गज खेळाडू
-शत्रूवरदेखील अशी वेळ येऊ नये! ९ तासांत दोन वेळा बाद होणारे ३ संघ