आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन मजबूत संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. यंदा आशिया चषक जिंकून भारतीय संघ तब्बल आठव्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे करणार की यजमान श्रीलंका भारताला पछाडत सातव्यांदा आशिया चषक जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. या अंतिम सामन्यापूर्वी स्पर्धेत आत्तापर्यंत ज्या फलंदाजांनी सर्वाधिक धावा केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
आशिया चषक 2023 मध्ये साखळी फेरी व सुपर फोरनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारताचा शुबमन गिल आहे. त्याने आतापर्यंत पाच सामने खेळताना 68.75 च्या सरासरीने 275 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व दोन अर्धशतके सामील आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुसल मेंडीस येतो. त्याने पाच सामने खेळताना 50.60 इतक्या सरासरीने 253 धावा केल्या आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेचा फलंदाज असून, मध्यफळीतील सदिरा समरविक्रमा याने 5 सामन्यात 215 धावांचे योगदान दिले आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने स्पर्धेत एका दीडशतकाच्या मदतीने 207 धावा केल्या. तर, पाकिस्तानचाच मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद रिझवान हा पाच सामन्यांत 195 धावा करण्यात यशस्वी ठरला.
या व्यतिरिक्त भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा देखील या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर त्याने सलग तीन सामन्यात अर्धशतके झळकावली. तर, तीन सामने खेळलेला विराट कोहली एक शतक झळकावू शकला आहे.
(Most Runs In Asia Cup 2023 Shubman Gill Tops Chart)
हेही वाचा-
भन्नाट, जबरदस्त! 2023 मध्ये ‘असा’ विक्रम फक्त टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ गिललाच जमला, नजर टाकाच
पदार्पणवीराने दोनच चेंडूत केला रोहितचा खेळ खल्लास; सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘ही माझी Dream Wicket…’