साऊथॅम्टन। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना द रोज बाऊल स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात खेळताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विलियम्सनचं अर्धशतक हुकलं, पण विक्रम झाला नावावर
या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. यामध्ये विलियम्सनने ४९ धावांचे योगदान दिले. याबरोबरच तो कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. त्याने स्टिफन फ्लेमिंग यांना या यादीत मागे टाकले आहे.
फ्लेमिंग यांनी कसोटीत ७१७२ धावा केल्या आहेत. तर विलियम्सनचे आता ८५ सामन्यांत ५३.५६ च्या सरासरीने ७१७८ धावा झाल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर ७५१७ धावांसह रॉस टेलर आहे. विशेष म्हणजे या तिघांनाच ७००० पेक्षा अधिक कसोटी धावा न्यूझीलंडकडून खेळताना करता आल्या आहेत.
विलियम्सनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २४ शतकं आणि ३२ अर्धशतकंही केली आहेत. तो न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी शतकं करणारा फलंदाज आहे. त्याच्याव्यतिरिक्त न्यूझीलंडकडून कोणत्याच फलंदाजाला २० पेक्षा अधिक शतकं कसोटीत करता आलेली नाहीत.
कसोटीत न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –
७५१७ – रॉस टेलर
७१७८ – केन विलियम्सन
७१७२ – स्टिफन फ्लेमिंग
६४५३ – ब्रेंडन मॅक्यूलम
५४४४ – मार्टिन क्रो
सामन्यात न्यूझीलंडचे वर्चस्व
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव ९९.२ षटकांत २४९ धावांवर संपला. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात डेवॉन कॉनवेने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विलियम्सनने ४९ धावांची खेळी केली. याशिवाय काईल जेमिसन २९, टीम साऊथी ३० आणि टॉम लॅथम ३० यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. भारताकडून मोहम्मद शमीने २६ षटकांत ७६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने ४४ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: भारताचे ‘सेफ हॅन्ड’ अॅक्शनमध्ये! रहाणेने स्लिपमध्ये घेतला अप्रतिम कॅच
नया हैं यह! शमीने भर मैदानात गुंडाळला टॉवेल, चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
महिला क्रिकेटसाठी मोठा दिवस! पुरुषांच्या मोठ्या सामन्यात महिला पंच करणार पंचगिरी