क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे महिला वनडे आणि टी२० सामने खेळवण्यात येतात, त्या तुलनेत महिला कसोटी सामने खूप कमी प्रमाणात आयोजित करण्यात येतात. महिला कसोटी क्रिकेटला जवळजवळ ८६ वर्षांचा इतिहास आहे.
महिलांचा पहिला कसोटी सामना १९३४ ला इंग्लंड महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात ब्रिस्बेन येथे खेळवण्यात आला होता. हा सामना तीन दिवसांचा होता, तसेच या कसोटी सामन्यात इंग्लंड महिला संघाने विजय मिळवला होता.
पण तेव्हापासून आत्तापर्यंत खूप कमी प्रमाणात महिलांच्या कसोटी सामन्यांचे आयोजन झाले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचा महिला संघ १०० पेक्षा अधिक कसोटी सामने खेळलेला नाही. महिलांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने इंग्लंडने खेळले आहेत. त्यांनी ९५ सामने खेळले आहेत.
महिला कसोटी सामन्यांचे प्रमाण कमी असल्याने आत्तापर्यंत कोणत्याच महिला क्रिकेटपटूला कसोटीमध्ये २००० धावांचा टप्पाही पार करता आलेला नाही. महिला कसोटीमध्ये आत्तापर्यंत केवळ १० क्रिकेटपटूंनी १००० धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये भारताच्या केवळ संध्या आग्रवाल यांचा समावेश आहे.
भारताने आत्तापर्यंत महिला कसोटीमध्ये ३६ सामने खेळले आहेत. तसेच भारतीय महिला संघाकडून आत्तापर्यंत ८३ क्रिकेटपटू कसोटी खेळले आहेत. यातील केवळ ६ क्रिकेटपटूंना कसोटीमध्ये ६०० धावांचा टप्पा पार करता आला आहे. या ६ क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ६ भारतीय क्रिकेटपटू (Six Indian batswomen who have scored the most runs in Women Test Cricket) –
१. संध्या अग्रवाल –
भारताची माजी कर्णधार संध्या अग्रवाल भारताकडून महिला कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. त्यांनी १३ कसोटी सामने खेळताना २३ डावात ५०.४५ च्या सरासरीने १११० धावा केल्या आहेत. महिला कसोटीमध्ये १००० धावांचा टप्पा पार करणाऱ्या त्या सध्यातरी एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहेत.
त्यांनी कसोटीमध्ये ४ शतके आणि ४ अर्धशतकेही केली आहेत. त्यामुळे महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीतही त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी १९८६ ला वर्सेस्टरमध्ये इंग्लंड महिला संघाविरुद्ध खेळताना पहिल्या डावात १९० धावा केल्या होत्या. या त्यांच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.
२. शांता रंगास्वामी –
१९७६ ते १९९१ दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अष्टपैलू क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणही वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण १६ कसोटी सामने खेळताना ३२.६० च्या सरासरीने ७५० धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या १ शतकाचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्यांनी कसोटी कारकिर्दीतील हे एकमेव शतक १९७७ ला न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध ड्यूनेडिन येथे खेळताना केले होते. त्या सामन्यात त्यांनी भारताच्या पहिल्या डावात १०८ धावांची खेळी केली होती. याशिवाय त्यांनी कसोटीमध्ये २१ विकेट्सही घेतल्या आहेत.
३. शुभांगी कुलकर्णी –
पुण्याच्या असणाऱ्या शुभांगी कुलकर्णी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७६ ते १९९१ दरम्यान भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान त्यांनी १९ कसोटी सामने खेळले. १९७६ ला बंगळुरु येथे वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्यांनी पदार्पण केले होते.
त्यांनी १९ कसोटी सामने खेळताना २३.३३ च्या सरासरीने ७०० धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या १ शतकाचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. हे एक शतक त्यांनी वेदर्बी येथे १९८६ला इंग्लंड महिला संघाविरुद्ध केले होते. त्यांनी त्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर खेळताना पहिल्याच डावात ११८ धावांची खेळी केली होती. तसेच त्यांनी १९ कसोटीत तब्बल ६० विकेट्सही घेतल्या आहेत.
४. मिताली राज –
भारताची सर्वात यशस्वी क्रिकेटपटू मिताली राजने कसोटी क्रिकेटमध्ये जानेवारी २००२ ला लखनऊ येथे इंग्लंड महिला संघाच्या विरुद्ध खेळताना पदार्पण केले. तेव्हापासून ती आत्तापर्यंत १० कसोटी सामने खेळली आहे. या १० कसोटी सामन्यात खेळताना तिने १ द्विशतक आणि ४ अर्धशतके करताना ५१.०० च्या सरासरीने ६६३ धावा केल्या आहेत.
तिने कसोटी क्रिकेटमधील द्विशतक ऑगस्ट २००२ ला इंग्लंड महिला संघाविरुद्ध टॉन्टन येथे खेळताना केले होते. तिने या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात ४०७ चेंडूत २१४ धावांची खेळी केली होती.
त्यावेळी महिला कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावांचाही विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या किरण बलूचने २४२ धावा करत मितालीचा हा विक्रम मो़डला. मिताली ही सध्यातरी महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी भारताची एकमेव फलंदाज आहे.
५. गार्गी बॅनर्जी –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ वर्षे १६५ दिवस एवढे वय असताना १९७८ ला इंग्लंड महिला संघाविरुद्ध वनडे सामन्यातून गार्गी बॅनर्जी यांनी पदार्पण केले होते. त्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू आहेत.
त्यांचे कसोटी पदार्पण १९८४ ला वयाच्या २० व्या वर्षी ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध दिल्ली येथे झाले. त्यांनी १९९१ पर्यंत १२ कसोटी सामने खेळताना २७.९० च्या सरासरीने ६ अर्धशतकांसह ६१४ धावा केल्या. ७५ धावा ही त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
६. सुधा शहा –
भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम सुधा शहा यांच्या नावावर आहे. त्यांनी १९७६ ला बंगळुरु येथे वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून १९९१ पर्यंत त्यांनी २१ कसोटी सामने खेळताना १८.७८ च्या सरासरीने ६०१ धावा केल्या. यामध्ये त्यांनी १ अर्धशतक केले आहे.
हे एकमेव अर्धशतक त्यांनी १९८६ ला ब्लॅकपूल येथे इंग्लंड महिला संघाविरुद्ध खेळताना केले होते. त्या सामन्यात त्यांनी भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद ६२ धावा केल्या होत्या.
ट्रेंडिंग घडामोडी –
टी२० विश्वचषक खेळायचा असेल तर हे जा या अग्नीदिव्यातून
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ धोनी-कोहली या भारतीय कर्णधारांनीच केला आहे तो पराक्रम






