क्रिकेटमध्ये बऱ्याचदा टी २०मध्ये तुफानी फलंदाजीची चाहते मजा घेतात. पण प्रथम श्रेणी किंवा कसोटी सामन्यात चौकार- षटकारांची आतिषबाजी क्वचितच पाहायला मिळते. असेच एका प्रथम श्रेणी सामन्यात एका फलंदाजाने तब्बल २४ षटकार खेचत विश्वविक्रम रचला आहे.
कुनार येथे झालेल्या काबुल रिजन विरुद्ध बूस्ट रिजन या संघांमध्ये ८ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान प्रथम श्रेणीचा सामना झाला. या सामन्यात शफीकुल्लाह शिनवारी या काबुल संघाच्या फलंदाजाने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात तब्बल २२ षटकारांची बरसात केली. असे मिळून या सामन्यात त्याने एकूण २४ षटकार खेचले.
त्यामुळे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोच्या नावावर होता. त्याने ऑकलंड संघाकडून खेळताना सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाविरुद्ध एका सामन्यात २३ षटकार मारण्याची कामगिरी केली होती.
काबुल रिजन विरुद्ध बूस्ट रिजन संघात झालेला सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात काबुल संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४१३ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ५ बाद ३१२ धावा केल्या. या डावात शफीकुल्लाहने फक्त १०३ चेंडूंतच २२ षटकारांच्या आणि ११ चौकारांच्या साहाय्याने नाबाद २०० धावा केल्या.
बूस्ट रिजन संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधीच भेटली नाही. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद २५० धावा केल्या होत्या.
प्रथम श्रेणी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
शफीकुल्लाह शिनवारी – २४ षटकार (काबुल रिजन विरुद्ध बूस्ट रिजन- २०१८)
कॉलिन मुन्रो – २३ षटकार (ऑकलंड विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट -२०१५)
रिषभ पंत – २१ षटकार (दिल्ली विरुद्ध झारखंड -२०१६)
अँड्र्यू सायमंड – २० षटकार (ग्लॉस्टरशायर विरुद्ध ग्लॅमॉर्गन-१९९५)