रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे भारत-दक्षिण आफ्रिका संघात तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ अंधूक सुर्यप्रकाशामुळे काहीवेळासाठी थांबवण्यात आला आहे. अंधूर सुर्यप्रकाशाचा व्यत्यय आला त्यावेळी भारतीय संघाने पहिल्या डावात 3 बाद 224 धावा केल्या होत्या.
या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. त्याने 164 चेंडूत नाबाद 117 धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एक खास विश्वविक्रमही केला आहे.
त्याने सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आत्तापर्यंत एकूण 17 षटकार मारले आहेत. त्यामुळे तो एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
त्याने वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू शिमरॉन हेटमेयरचा 15 षटकारांचा विक्रम मागे टाकला आहे. हेटमेयरने मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 15 षटकार मारले होते.
सध्या सुरु असलेल्या रांची कसोटीत रोहितबरोबर अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असून त्याने अर्धशतक पूर्ण करताना 135 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज-
17 – रोहित शर्मा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)*
15 – शिमरॉन हेटमेयर (वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश, 2018)