मंगळवारी(६ ऑक्टोबर) आयपीएल २०२०मध्ये २० वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवला. मुंबईनी प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९३ धावा केल्या होत्या आणि राजस्थानला १९४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानला १८.१ षटकात सर्वबाद १३६ धावाच करता आल्या.
या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून एकूण ६ षटकार मारण्यात आले. त्यामुळे मुंबई इंडियन्स आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ ठरला आहे. मुंबईकडून आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ११५६ षटकार मारण्यात आले आहेत. तर बेंगलोरने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ११५२ षटकार लगावण्यात आले आहेत.
आयपीएलमध्ये १००० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार आत्तापर्यंत केवळ ४ संघांकडून मारण्यात आले आहेत. यात मुंबई आणि बेंगलोर व्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्सचा समावेश आहे. पंजाबने १००८ षटकार मारले आहेत. तर चेन्नईने १००६ षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे संघ –
११५६ – मुंबई इंडियन्स
११५२ – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
१००८ – किंग्स इलेव्हन पंजाब
१००६ – चेन्नई सुपर किंग्स
९६२ – कोलकाता नाईट रायडर्स
९२१ – दिल्ली कॅपिटल्स
७३० – राजस्थान रॉयल्स
५५१ – सनरायझर्स हैदराबाद