---Advertisement---

टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नवा किंग! क्विंटन डी कॉकची फिफ्टी अन् एबी डिविलियर्सचा विक्रम मोडीत

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 2:09 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्वातील मिस्टर ३६० एबी डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याने केलेले विक्रम तोडणे अवघड असले तरी क्विंटन डी कॉकने जेव्हा-जेव्हा धावांचा पाऊस पाडला तेव्हा-तेव्हा त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. नुकतेच त्याने डिविलियर्सच्या एका महत्वाच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

क्विंटनने बुधवारी (११ फेब्रुवारी) अफगाणिस्तानविरुद्ध अहमदाबादमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने डिविलियर्सच्या विक्रमाला मागे टाकले. या सामन्यात त्याने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ४१ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याचे हे टी२० विश्वचषकातील पाचवे अर्धशतक ठरले आहे.

डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत टी२० विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी ३० सामन्यांमध्ये ७१७ धावा केल्या. क्विंटनने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने हा आकडा पार केला आहे. त्याच्या या स्पर्धेतील २९ सामन्यांमध्ये ७२६ धावा झाल्या आहेत. या यादीत जेपी ड्युमिनी २५ सामन्यांत ५६८ धावा करत तिसऱ्या आणि डेविड मिलर २९ सामन्यांत ४६२ धावा करत चौथ्या स्थानावर आहे. तसेच मार्करमच्या २१ टी२० विश्वचषकाच्या सामन्यात ४४८ धावा झाल्या आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. कर्णधार ऍडम मार्करम लवकरच बाद झाल्याने क्विंटनने रायान रिकल्टनच्या साहाय्याने संघाचा धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. रिकल्टन २८ चेंडूत ६१ धावा करत बाद झाला. दोघांनाही राशिद खानने बाद केले. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ६ विकेट्स गमावत १८७ धावा केल्या.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सामना असून त्यांनी पहिल्या सामन्यात कॅनडाचा पराभव केला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---