---Advertisement---

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू

On: शुक्रवार, मे 1, 2020 2:56 PM
---Advertisement---

महाराष्ट्रातून आलेल्या अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत क्रीडा जगतात नाव गाजवले आहे. यात क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. महाराष्ट्राने भारतीय संघाला अनेक दिग्गज क्रिकेटपटू दिले आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून सध्याचा युवा पृथ्वी शॉपर्यंत अनेक महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंनी भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले आहेत.

अशाच कसोटीमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे महाराष्ट्रीयन खेळाडू – 

५. रवी शास्त्री-

भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी फेब्रुवारी १९८१ ला न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ८० कसोटी सामने खेळले. त्यांनी या ८० सामन्यात ३५.८९ च्या सरासरीने ३८३० धावा केल्या आहेत. त्यात ११ शतकांचा आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २०५ ही त्यांची कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी आहे. याबरोबरच त्यांनी १५१ विकेट्स देखील घेतल्या आहेत.

४. अजिंक्य रहाणे –

भारतीय कसोटी संघाचा सध्याचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कसोटीमध्ये मधल्या फळीत खेळताना अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्याने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्ली येथे कसोटी पदार्पण केले होते.

त्यानंतर तो आत्तापर्यंत ६५ कसोटी सामना खेळला आहे. यामध्ये त्याने ११ शतके आणि २२ अर्धशतकांसह ४२०३ धावा केल्या आहेत. १८८ ही त्याची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी आहे.

३. दिलीप वेंगसरकर – ८० च्या दशकात भारतीय संघातील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे दिलीप वेंगसरकर. त्यांनी जानेवारी १९७६ ला न्यूझीलंड विरुद्ध ऑकलंडला झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ११६ कसोटी सामने खेळले. या ११६ सामन्यांमध्ये त्यांनी १७ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ४२.१३ च्या सरासरीने ६८६८ धावा केल्या आहेत. त्यांनी १९९२ ला त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला.

२. सुनिल गावसकर –

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी आत्तापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. त्यातील एक खास विक्रम म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात आधी १० हजार धावा करण्याचा मान सुनिल गावसकरांना मिळला आहे.

गावसकरांनी १९७१ ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते १९८७ पर्यंत १२५ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या. यात त्यांनी ३४ शतके आणि ४५ अर्धशतके केली आहेत. नाबाद २३६ धावांची खेळी ही त्यांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे.

१. सचिन तेंडुलकर – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वयाच्या १६ व्या वर्षी १५ नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला आणि आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. त्याने तेव्हापासून २४ वर्ष त्याच्या अफलातून फलंदाजीने सर्वांनाच भूरळ घातली.

या २४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळताना ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा केल्या. यात त्याने ५१ शतके करतानाच कसोटीत ५० पेक्षा जास्त शतके करणारा पहिलाच फलंदाज बनण्याचा मानही मिळवला. सचिनने शेवटचा सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर १४ ते १६ नोव्हेंबर २०१३ला खेळला.

ट्रेंडिंग लेख –

आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा फटका, पहिल्या स्थानावरुन थेट…

५ अशी कारणं ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार

एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---