इंडियन प्रिमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील ५० वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सोमवारी (४ ऑक्टोबर) खेळवला गेला. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ३ गाड्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. या विजयासह दिल्लीने सर्वात जास्त वेळा चेन्नईला हरवण्याच्या यादीत दुसरे स्थान गाठले आहे.
दिल्ली संघाने चेन्नईला दहाव्या वेळेस हरवले आहे. यासोबतच त्यांनी राजस्थान रॉयल्सची बरोबरी केली आहे. राजस्थाननेही चेन्नईला १० वेळेस हरवले आहे. चेन्नई संघाला सर्वात जास्त वेळा धूळ कुणी चारली असेल, तर ती मुंबई इंडियन्सच्या संघाने. मुंबईने तब्बल १९ वेळा चेन्नईला हरवले आहे.
सोमवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करताना केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५५ धावा झळकावल्या. त्याला धोनीने १८ धावांची साथ दिली. तर उथाप्पाने देखील १९ धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने २ तर आवेश खान, नॉर्खिया आणि आश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. सर्वच गोलंदाजांनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला १३६ धावांवर रोखलं.
चेन्नईने दिल्लीसमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या ३९ धावा आणि शिमरॉन हीटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद २८ धावांच्या जोरावर दिल्लीने सामन्यावर पकड ठेवली. शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत दिल्लीला ३ गड्यांनी सामना जिंकून दिला.
दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये पुन्हा तळपली ‘गब्बर’ची बॅट! ५ व्यांदा ‘असा’ कारनामा करत धवनची विराटशी बरोबरी
‘बर्थडे बॉय’ला दिल्लीकडून विजयी भेट; पंत वाढदिवशी ‘असा’ कारनामा करणारा तेंडुलकरनंतरचा दुसराच कर्णधार
‘धोनी सीएसकेचा बॉस’, आयपीएल २०२१ ‘कॅप्टनकुल’चा अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चेवर स्टेनचे भाष्य