मुंबई। चेन्नई सुपर किंग्स संघाला सोमवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामातील ३८ व्या सामन्यात पंजाब किंग्सविरुद्ध पराभवचा सामना करावा लागला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला ११ धावांनी पराभूत केले. चेन्नईचा हा हंगामातील सहावा पराभव ठरला.
पंजाबचा चेन्नईविरुद्ध १२ वा विजय
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ससाठी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Punjab Kings vs Chennai Super Kings) सोमवारी मिळवलेला एकूण १२ वा विजय ठरला. त्यामुळे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिकवेळा विजय मिळवणाऱ्या संघांमध्ये पंजाबने दुसरे स्थान आणखी बळकट केले आहे. पंजाब आणि चेन्नई या दोन संघात आत्तापर्यंत २७ सामने झाले आहेत. त्यातील १५ सामन्यांत चेन्नईने आणि १२ सामन्यांत पंजाबने विजय मिळवला आहे (Most Wins against CSK).
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिकवेळा विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने १९ वेळा चेन्नईविरुद्ध विजय मिळवला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाबच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संयुक्तरित्या आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी १० वेळा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवला आहे.
रायुडूचे अर्धशतक व्यर्थ
सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १८७ धावा केल्या. पंजाबकडून शिखर धवनने ८८ धावांची खेळी केली. तसेच भानुका राजपक्षाने ४२ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने २ आणि महिशा तिक्षणाने १ विकेट घेतली.
त्यानंतर १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईकडून अंबाती रायुडूने ३९ चेंडूंत ७८ धावांची खेळी केली. तसेच ऋतुराज गायकवाडने ३० धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७६ धावांच करता आल्याने ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
नशीब बलवत्तर! पंजाबच्या फलंदाजाला २ वेळा मिळाले जीवनदान, सीएसकेच्या खेळाडूंनी सोडले सोपे झेल
वयाच्या ६६व्या वर्षी भारताचा माजी क्रिकेटपटू करणार दुसरे लग्न, नवरीचे वय ऐकून बसेल धक्का
CSKvsPBKS | अंबाती रायुडूची एकाकी झुंज व्यर्थ, पंजाबकडून चेन्नईचा ११ धावांनी पराभव