कोलंबो। रविवारी आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय संघाने प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली निदाहास ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने या सामन्यात बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली.
या विजयाबरोबरच रोहितने कर्णधार म्हणून एक खास विक्रम केला आहे. ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने या यादीत शोएब मलिकची बरोबरी केली आहे.
रोहितने आत्तापर्यंत ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५ वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये एकाही अंतिम सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या संघाने पराभव स्वीकारलेला नाही.
रोहितने कर्णधार म्हणून आयपीएलची ३ विजेतीपदे(२०१३,२०१५,२०१७), २०१३ ची चॅम्पिअन्स लीग टी २० विजेतेपद आणि निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद असे पाच विजेतेपदे मिळवली आहेत.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कॅप्टनकूल एमएस धोनी अव्वल स्थानी आहे. धोनीने कर्णधार म्हणून ११ अंतिम सामन्यांपैकी ६ अंतिम सामन्यात विजय मिळवलेले आहे.
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला निदाहास ट्रॉफी तिरंगी टी २० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत या स्पर्धेत रोहितने भारताचे नेतृत्व केले होते.
ट्वेन्टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवणारे कर्णधार:
६ विजय – एम एस धोनी (११ अंतिम सामने)
५ विजय – शोएब मलिक (९ अंतिम सामने)
५ विजय – रोहित शर्मा (५ अंतिम सामने)