मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यातील युवा क्रिकेटपटू कौशल तांबे( Kaushal Tambe) सातत्याने चर्चेत आहे. संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आशिया कप (U19 Cricket Asia Cup) स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल अनेक मान्यवर मंडळी त्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीदेखील फेसबुक पोस्ट करत त्याचे कौतुक केले.
जुन्नर तालुका ज्या लोकसभा मतदारसंघात येतो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कौशलच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले ‘जुन्नर तालुक्यातील ओतूरचा सुपुत्र कौशल सुनील तांबे याची आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड झाली, याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन!’
त्यांनी पुढे म्हटले, ‘पुणे एटीएसचे एसीपी श्री. सुनील तांबे यांचा पुत्र असलेल्या कौशल याने अथक परिश्रम व प्रतिभेच्या बळावर अतिशय चमकदार कामगिरी केली असून विजय हजारे चषक स्पर्धेत सौराष्ट्र संघाविरुद्ध त्रिशतक आणि गुजरात विरुद्ध द्विशतक अशी सर्वोत्तम कामगिरी करणारा कौशल दुबई येथे होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कौशलला या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा!’
https://www.facebook.com/527035653979629/posts/5353428911340255/?d=n
अशी राहिली आहे कौशलची कामगिरी
सध्या १८ वर्षाचा असलेला कौशल मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र क्रिकेट संघाचे (Maharashtra Cricket Team) विविध वयोगटात प्रतिनिधित्व करत आहे. इतकेच नव्हे तर त्याने १६ वर्षाखालील पश्चिम विभागीय संघाचा कर्णधार म्हणून भूमिका निभावली होती. विनू मंकड ट्रॉफी आणि चॅलेंजर्स ट्रॉफीमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा आहे.
पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या कौशलने पुण्यातील विविध क्लबमधून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. केंड्स क्रिकेट अकादमीत तो मागील दहा वर्षापासून प्रशिक्षण घेत आहे. तसेच त्याला २०१६ मध्ये एमसीएचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. आशिया कपसाठी त्याच्यासह विकी ओस्तवाल व राजवर्धन हंगारगेकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि…’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विराटचा जुन्या आठवणींना उजाळा