22 जून 2024 महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2024 स्पर्धेत अंतिम लढतीत किरण चोरमले (Kiran Chormale) 35 धावा, निखिल नाईक (Nikhil Naik) नाबाद 36 धावा यांनी केलेल्या महत्वपूर्ण खेळीसह सत्यजीत बच्छाव 4-31 याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स (RJ) संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा 24 धावांनी पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुमारे 30000 पुणेकरांनी आपली उपस्थिती लावली होती. यावेळी लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी आपली गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने अंतिम लढतीत ईगल नाशिक टायटन्सवर वर्चस्व गाजवले.
रत्नागिरीचे सलामीचे फलंदाज कर्णधार अझीम काझी 8, दिव्यांग हिंगणेकर 4, सत्यजीत बच्छाव 5 हे झटपट बाद झाले. अझीमला मुकेश चौधरीने झेलबाद करून रत्नागिरी संघाला पहिला धक्का दिला. हरी सावंतने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पाठोपाठ दिव्यांग हिंगणेकरला हरी सावंतने बाद केले. रत्नागिरीने पहिल्यांदाच सत्यजीतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरविले. पण हा बदल यशस्वी ठरला नाही. समाधान पांगरेने सत्यजीतला झेलबाद केले. आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात धीरज फटांगरे 27 धावावर बाद झाला. किरण चोरमले व अभिषेक पवार यांनी पाचव्या विकेटसाठी 28 चेंडूत 44 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
किरण चोरमलेने 23 चेंडूत 35 धावांची संयमी खेळी केली. त्यात त्याने 3 चौकार व 2 षटकार मारले. त्याला अभिषेक पवारने 22 चेंडूत 3 षटकारासह 28 धावांची खेळी करून साथ दिली. हे दोघेही आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. त्यानंतर निखिल नाईकने 25 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 36 धावांची खेळी करून संघाला 160 धावांचे आव्हान उभे करून दिले.
160 धावांचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघाला 20 षटकात 9 बाद 136 धावाच करता आल्या. रत्नागिरी जेट्सच्या सत्यजीत बच्छाव 4-31, दिव्यांग हिंगणेकर 2-13, कुणाल थोरात 2-19 यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे फलंदाज मंदार भंडारी 7, अर्शिन कुलकर्णी 9, साहिल पारीख 0, कौशल तांबे 9 हे स्वस्तात तंबूत परतले. टप्प्याटप्प्याने विकेट पडत राहिल्यामुळे ईगल नाशिक टायटन्स संघ 4 बाद 33 असा बॅकफुटवर गेला. त्यानंतर मुकेश चौधरीने एकाबाजूने लढताना 35 चेंडूत 2 चौकार व 4 षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 50 धावा, अथर्व काळे 15 यांनी धावा काढून थोडासा प्रतिसाद दिला. परंतु सामना जिंकू शकले नाहीत.
रत्नागिरी जेट्सच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघातील खेळाडूंना पाठिंबा दिला. गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्सवर वर्चस्व गाजवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला ट्रॉफी व 50 लाख रुपये, तर उपविजेत्या ईगल नाशिक टायटन्स संघाला ट्रॉफी व 25 लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
नाद करा पण कोहलीचा कुठं! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज
हार्दिक पांड्याचं विस्फोटक अर्धशतक! भारताचं बांग्लादेशसमोर 197 धावांचं आव्हानं
IND vs BAN सामन्यात बांग्लादेशनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11