---Advertisement---

MPL 2025: एमपीएलला मिळणार नवा विजेता! ईगल नाशिक टायटन्स आणि रायगड रॉयल्स दरम्यान फायनलचे द्वंद्व

On: रविवार, जून 22, 2025 3:27 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा रविवारी (22 जून) समारोप होत आहे. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रायगड रॉयल्स असा अंतिम सामना खेळला जाईल. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी झुंज देणार आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा अंतिम सामना पार पडेल.

पहिल्या दोन हंगामात तिसरा क्रमांक व दुसरा क्रमांक पटकावलेल्या ईगल नाशिक टायटन्सने या हंगामात गुणतालिकेत अव्वलस्थान राखले. क्वालिफायर 1 मध्ये पुणेरी बाप्पाला सहज पराभूत करत नाशिकने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे.‌ तर, रायगड रॉयल्स प्रथमच प्ले ऑफ्स आणि नंतर अंतिम सामन्यात दाखल झालेले आहेत. पहिल्या दोन हंगामात संघाला तळाच्या स्थानी समाधान मानावे लागलेले. तिसऱ्या हंगामात गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावून त्यांनी प्ले ऑफ्समध्ये प्रवेश केलेला. त्यानंतर एलिमिनेटर व क्वालिफायर 2 सामने जिंकत ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले आहेत.

ईगल नाशिक टायटन्स संघाचे सर्वच खेळाडू विजयात योगदान देताना दिसले आहेत. मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम, साहिल पारख व रोहन दामले यांनी फलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळलेली दिसते. तर, गोलंदाजी विभागात कर्णधार प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी व अक्षय वायकर यांचा अनुभव कामी येतोय. अंतिम सामन्यात देखील संघाला त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. दुसरीकडे रायगड रॉयल्सने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावलेला आहे. सिद्धेश वीर, नीरज जोशी व कर्णधार ऋषभ राठोड यांनी संघाच्या फलंदाजीला मजबुती दिली असून, गोलंदाजीत निखिल कदम व तनय संघवी यांनी सातत्याने बळी मिळवले आहेत. फिरकी जोडी विकी ओस्तवाल व शुभम कदम यांनी प्ले ऑफ्सच्या दोन्ही सामन्यात सर्वाधिक योगदान दिलेले दिसते.

गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मागील काही सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टी दिसून आली आहे. सुरुवातीच्या तुलनेत फलंदाजांना अधिक संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 160 धावांच्या पुढे मजल मारण्याचा प्रयत्न करेल. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत सरस असल्याच्या कारणाने ईगल नाशिक टायटन्सला विजेतेपद बहाल केले जाईल.

संभाव्य प्लेईंग इलेव्हन:

ईगल नाशिक टायटन्स- मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम, साहिल पारख, अथर्व काळे, योगेश डोंगरे, रोहन दामले, कौशल तांबे, प्रशांत सोलंकी (कर्णधार), मुकेश चौधरी, अक्षय वायकर

रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, विकी ओस्तवाल, हर्ष संघवी, ऋषभ राठोड (कर्णधार), नीरज जोशी, ओमकार खाटपे, अजय बोरुडे, तनय संघवी, निखिल कदम, सागर जाधव, शुभम कदम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---