देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात MPLला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगचे हे तिसरे वर्ष आहे. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या लीगमध्ये यंदा प्रत्येक संघाला साखळी फेरीत 10 सामने खेळता येणार आहेत. या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी जिवाचं रान करतील. या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील. (MPL 2025: Full Squad of Ratnagiri Jets for Maharashtra Premier League)
चला तर मग या आपण एमपीएलच्या सलग 2 ट्राॅफीवर आपले नाव कोरलेल्या रत्नागिरी जेट्सच्या स्कॉडवर नजर टाकूया. एमपीएलच्या पहिल्या हंगामात संघाने आपल्या दमदार कामगिरीसह फायनलमध्ये धडक मारत पहिला हंगाम गाजवला होता. रत्नागिरीने कोल्हापूरचा धुव्वा उडवत एमपीएलची ट्राॅफी उंचावली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामातही अझीम काझीच्या (Azim Kazi) नेतृत्वाखालील संघाने त्याच ताकदीने दुसऱ्यांदा एमपीएलच्या ट्राॅफीवर कब्जा केला. यावेळीही संघ सलग तिसऱ्यांदा एमपीएलच्या ट्राॅफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज असेल.
रत्नागिरी जेट्सचा संघ या स्पर्धेत एकूण 10 सामने खेळणार आहे. यादरम्यान साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना (4 जून) आणि शेवटचा सामना (19 जून) रोजी होणार आहे. या लीगच्या तिसऱ्या हंगामात देखील संघाचे नेतृत्व अझीम काझी (Azim Kazi) कडे असणार आहे. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)
एमपीएल 2025 साठी रत्नागिरी जेट्स संघ- अझीम काझी (कर्णधार), क्रिश शाहापुरकर, अखिलेश गवळे, जय पांडे, जोएरुबेन्सन पर्देशी, अजिंक्य नाईक, अभिमन्यू जाधव, यशवंत काळे, कुणाल थोरात प्रदीप डाढे, सत्यजीत बच्छाव, विजय पावले, मनोज यादव, प्रतीमेश गावडे, अतिश राठोड, निखिल नाईक, अभिषेक पवार, दिव्यांग हिंगणेकर, किरण चोरमले, साहिल चुरी, रोहित पाटील, धिरज फटांगरे, प्रीतम पाटील, संग्राम भालेकर, योगेश चव्हाण, अश्कन काझी, सिद्धांत गिरी, समर्थ कदम, हर्षील सावंत, कृष्णा मार्तंड
या स्पर्धेत (20 जून) रोजी क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. तर (21 जून) रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. (22 जून) रोजी फायनलचा सामना खेळला जाईल.
प्रेक्षकांना मिळणार मोफत प्रवेश
MPLचे सर्व सामने तसेच WMPLचेही सर्व सामने यावेळी प्रेक्षकांना पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जाऊन मोफत पाहता येणार आहे. याची माहिती यापुर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित दादा पवार यांनी दिली आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही रोहित दादा पवार केले आहे.
घरबसल्या सामन्यांचा आनंद घेता येणार
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.






