महेंद्रसिंह धोनीनं 2004 साली भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धोनी त्या काळात त्याच्या लांब केसांसाठी ओळखला जायचा. तेव्हा देखील तो खूप लोकप्रिय होता, मात्र हे कोणालाच माहित नव्हतं की तो भारतातील एक महान खेळाडू म्हणून उदयास येईल. धोनी आणि त्याचे चाहते 31 ऑक्टोबर 2005 ही तारीख कदाचित कधीच विसरणार नाहीत. कारण या दिवशी त्यानं श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक खेळी खेळली होती.
2005 साली श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. 7 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघानं पहिले दोन सामने जिंकले होते. तिसरा सामना जयपूरमध्ये झाला, ज्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 298 धावा केल्या. त्या सामन्यात कुमार संगकारानं 138 धावांची खेळी खेळली होती. प्रत्युत्तरात, टीम इंडियानं 23 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला आणि मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात एमएस धोनीनं 183 धावांची नाबाद खेळी खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवली होती. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघानं सचिन तेंडुलकरची विकेट लवकर गमावली. त्यावेळी धोनी भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायाचा. त्यानं प्रथम वीरेंद्र सेहवागसोबत 92 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुल द्रविड, युवराज सिंग आणि इतर फलंदाज येत-जात होते, परंतु धोनीनं एक टोक सांभाळून ठेवलं.
एमएस धोनीनं त्या सामन्यात 145 चेंडूत नाबाद 183 धावा केल्या होत्या. या ऐतिहासिक खेळीत त्यानं 15 चौकार आणि 10 षटकार ठोकले. या खेळीद्वारे धोनीनं धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला होता. हा विश्वविक्रम 2011 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसननं मोडला. त्यानं बांगलादेशविरुद्ध 96 चेंडूत 185 धावांची खेळी केली होती.
हेही वाचा –
INDA VS AUSA; ऋतुराजची पुन्हा फ्लाॅप कामगिरी, 107 धावांत भारताचा डाव आटोपला..!
रिषभ पंतची मागणी अपूर्ण, आता केकेआरच्या बड्या स्टारला दिल्ली कॅपिटल्स करणार कर्णधार?
केवळ 3 टी20 सामने खेळून नशीब उजळले, या खेळाडूला होणार करोडोंचा फायदा