fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

त्याचे प्रत्येक ‘शतक’ म्हणजे इतिहास; पाहा कॅप्टन कुल धोनीची आंतरराष्ट्रीय शतके

भारताचा कॅप्टन कुल, महेंद्रसिंग धोनीच्या सर्व आंतरराष्ट्रीय शतकांवर एक नजर...

‘महेंद्रसिंग धोनी’ हा भारताचा असा खेळाडू आहे, ज्याने संघाला अनेकदा पराजयाच्या गर्तेतून बाहेर काढले आणि विजयी केले. त्यातही एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून धोनीने पार पाडलेल्या भूमिका महत्वाच्या आहेत.

‘मिडास टच्’ असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जसा संघाचे उत्तम नेतृत्व करणारा खेळाडू आहे, तसाच तो एक भरवशाचा फलंदाज देखील आहे. ‘संकटमोचक धोनी’ अशी ओळख असलेल्या या खेळाडूने संघासाठी अनेकदा महत्वाच्या खेळी केल्या आहेत.

कर्णधार, यष्टीरक्षक याप्रमाणेच मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाज म्हणून धोनीचे संघात स्थान आहे. धोनीने आजपर्यंतच्या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दित अनेक धावा केल्या आहेत. या धावांची संख्या 15 हजारांच्या घरात आहे. त्यात अनेक शतके आणि अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एम.एस. धोनी…

धोनीने भारतीय संघाचे एकदिवसीय, टी-20, कसोटी या तीनही प्रकारात प्रतिनिधीत्व आणि नेतृत्व केले आहे. तसेच तो ‘आशिया इलेव्हन’ संघाकडून देखील खेळला आहे.

“महेंद्रसिंग धोनीने आजपर्यंत सुमारे 538 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळले आहेत. ज्यात त्याने वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये मिळून तब्बल 16 शतके साकारली आहेत. यापैकी 6 शतके कसोटी सामन्यात, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 शतके साकारली आहेत. धोनीने वनडेतील 10 शतकांपैकी 1 शतक हे ‘आशिया इलेव्हन’ संघाकडून खेळताना झळकावले आहे.”

गमतीचा भाग म्हणजे धोनीच्या १६ शतकांपैकी एकही शतक आशिया खंडाबाहेरील नाही. 

महेंद्रसिंग धोनीच्या सर्व आंतरराष्ट्रीय शतकांवर एक नजर…

  • कसोटीमध्ये धोनीने झळकावलेली ‘सहा’ शतके :

पहिले कसोटी शतक : 153 चेंडूत 148 धावा

विरुद्ध संघ पाकिस्तान (फैसलाबाद, 21 जानेवारी 2006)

भारत आणी पाकिस्तान यांच्यातील तो सामना अनिर्णित राहिला होता. मात्र, धोनीने या सामन्यात आपले पहिले कसोटी शतक साकारत तब्बल 148 धावा केल्या होत्या.

दुसरे कसोटी शतक : 159 चेंडूत 110 धावा

विरुद्ध संघ श्रीलंका (अहमदाबाद, 16 नोव्हेंबर 2009)

श्रीलंका संघाविरुद्धचा तो सामना देखील अनिर्णित राहिला होता. ज्यात धोनीने पहिल्या डावात 110 धावा बनवल्या होत्या.

तिसरे कसोटी शतक : 154 चेंडूत 100* धावा

विरुद्ध संघ श्रीलंका (मुंबई, 2 डिसेंबर 2009)

भारताने या सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि 24 धावांनी पराभव केला होता. या सामन्यातील पहिल्याच डावात धोनीने नाबाद 100 धावा केल्या होत्या.

चौथे कसोटी शतक : 187 चेंडूत 132* धावा

विरुद्ध संघ दक्षिण आफ्रिका (कोलकाता, 14 फेब्रुवारी 2010)

कोलकाता येथे झालेला या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रीकेवर एक डाव आणि 57 धावांनी मात केली होती. या सामन्यातील पहिल्या डावात खेळताना धोनीने नाबाद 132 धावांची महत्वपुर्ण खेळी केली होती.

पाचवे कसोटी शतक : 175 चेंडूत 144 धावा

विरुद्ध संघ वेस्ट इंडीज (कोलकाता, 14 नोव्हेंबर 2011)

भारताने वेस्ट इंडीज संघाला या सामन्यात एक डाव आणि 15 धावांनी मात दिली होती. धोनीने या सामन्यातील पहिल्या डावात तब्बल 144 धावा केल्या होत्या.

सहावे कसोटी शतक : 265 चेंडूत 224 धावा

विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (चेन्नई, 22 फेब्रुवारी 2013)

“भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला हा सामना भारताने ऑस्ट्रेलियाला 8 विकेटने हरवत आपल्या खिशात टाकला होता. या सामन्यात धोनीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एकमेव द्विशतक आणि सर्वोच्च धावसंख्या केली होती. धोनीच्या 224 धावांच्या योगदानाबद्दल त्याला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.”

  • एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीने झळकावलेली ‘दहा’ शतके :

पहिले वनडे शतक : 123 चेंडूत 148 धावा (15 चौकार, 4 षटकार)

विरुद्ध संघ पाकिस्तान (विशाखापट्टनम, 5 एप्रिल 2005)

भारताने या सामन्यात पाकिस्तानला 58 धावांनी हरवले होते. तसेच या सामन्यातच धोनीने त्याचे पहिले वनडे शतक झळकावले होते. धोनीला 148 धावांच्या योगदानाबद्दल ‘सामनावीर’ म्हणून निवडले होते.

दुसरे वनडे शतक : 145 चेंडूत 183* धावा (15 चौकार, 10 षटकार)

विरुद्ध संघ श्रीलंका (जयपुर, 31 ऑक्टोबर 2005)

“भारतीय संघाने या सामन्यात श्रीलंका संघाला 6 विकेटने मात दिली होती. आपल्या ‘हेलिकॉफ्टर शॉट’ने धोनीने तो सामना गाजवला होता. तसेच याच सामन्यात धोनीने त्याची एकदिवसीय सामन्यांमधील सर्वोच्च धावसंख्या 183 धावा केल्या होत्या. त्यामुळे धोनीला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.”

तिसरे वनडे शतक : 97 चेंडूत 139* धावा (15 चौकार, 5 षटकार)

विरुद्ध संघ आफ्रिका इलेव्हन (चेन्नई, 10 जून 2007)

“आशिया इलेव्हन संघाकडून खेळताना महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. हा सामना आशिया इलेव्हन संघाने आफ्रिका इलेव्हन संघाला 13 धावांनी नमवत जिंकला होता. धोनीला त्याच्या 139 धावांच्या कामगिरीबद्दल ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले होते.”

चौथे वनडे शतक : 96 चेंडूत 109* धावा (6 चौकार, 6 षटकार)

विरुद्ध संघ हाँगकाँग (कराची, 25 जुन 2008)

भारताने हाँगकाँगला या सामन्यात तब्बल 256 धावांनी पराभूत केले होते. महेंद्रसिंग धोनीने यावेळी 109 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती.

पाचवे वनडे शतक : 107 चेंडूत 124 धावा (9 चौकार, 3 षटकार)

विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (नागपूर, 28 ऑक्टोबर 2009)

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा सामना भारताने 99 धावांनी जिंकला होता. या सामन्यात धोनीने पाचवे वनडे शतक ठोकले होते. धोनीला यावेळी ‘सामनावीर’ म्हणून गौरविले होते.

सहावे वनडे शतक : 111 चेंडूत 107 धावा (8 चौकार, 2 षटकार)

विरुद्ध संघ श्रीलंका (नागपूर, 18 डिसेंबर 2009)

धोनीने श्रीलंका विरुद्धच्या या सामन्यात दमदार शतक ठोकले होते. मात्र, भारताने हा सामना गमावला होता.

सातवे वनडे शतक : 107 चेंडूत 101* धावा (9 चौकार)

विरुद्ध संघ बांगलादेश (ढाका, 7 जानेवारी 2010)

बांगलादेश विरुद्धचा हा सामना धोनीने चांगलाच गाजवला होता. या सामन्यात त्याने नाबाद शतकी खेळी केली होती. तसेच भारताने हा सामन्यात 6 विकेट राखून बांगलादेशला पराभूत केले होते. धोनीला सामन्यानंतर त्याच्या शतकी खेळी बद्दल ‘सामनावीर’ म्हणून घोषीत करण्यात आले होते.

आठवे वनडे शतक : 125 चेंडूत 113* धावा (7 चौकार, 3 षटकार)

विरुद्ध संघ पाकिस्तान (चेन्नई, 30 डिसेंबर 2012)

भारताने पाकिस्तान विरुध्दचा हा सामना जरी गमावला होता, तरिही धोनीच्या नाबाद शतकी खेळीमुळे तेव्हा त्यालाच ‘सामनावीर’ ठरण्यात आले होते.

नववे वनडे शतक : 121 चेंडूत 139* धावा (12 चौकार, 5 षटकार)

विरुद्ध संघ ऑस्ट्रेलिया (मोहाली, 19 ऑक्टोबर 2013)

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सामन्यात एम.एस. धोनीने जोरदार फलंदाजी करत नाबाद 139 धावा केल्या होत्या. मात्र, भारत या सामन्यात पराभूत झाला होता.

दहावे वनडे शतक : 122 चेंडूत 134 धावा (10 चौकार, 6 षटकार)

विरुद्ध संघ इंग्लंड (कटक, 19 जानेवारी 2017)

भारताने या सामन्यात इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला होता. महेंद्रसिंग धोनीने सामन्यात तब्बल 134 धावांची खेळी केली होती.

भारताचा एक यशस्वी क्रिकेटपटू : महेंद्रसिंग धोनी

भारतीय संघाचा एक यशस्वी क्रिकेटपटू आणि यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे नाव घेतले जाते. धोनी हा एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) खेळवल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा जिंकून दिल्या आहेत.

“धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. तसेच महेंद्रसिंग धोनीच्यात नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट क्रमवारीत क्रमांक 1 चे स्थान पटकावले होते.”

You might also like