कटक। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनीने थिसेरा परेराला स्टॅम्पिंग करून बाद केले आणि एक मोठा विक्रम रचला.
परेरा हा धोनीचा टी २० क्रिकेट प्रकारातील २०० वा बळी ठरला आहे. परेराला बाद करताच धोनी टी २० मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत पाकिस्तानचा यष्टीरक्षक कामरान अकमल २०७ बळींसह अव्वल स्थानी आहे.
याबरोबरच धोनीने आजपर्यंत टी २० मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक वेळा झेल पकडण्याच्या यादीत कुमार सांगकाराची बरोबरी केली आहे. आता हे दोघेही या यादीत अव्वल स्थानी आहेत. त्यांनी प्रत्येकी १३३ झेल पकडले आहेत.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून एकूण ७६६ बळी घेतले आहेत.
आज धोनीने फलंदाजी करतानाही चांगली कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना २२ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचला. त्याने मनीष पांडेबरोबर केलेल्या आक्रमक नाबाद अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना १८० धावांचा टप्पा पार केला.
यष्टीरक्षक म्हणून टी २० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे क्रिकेटपटू:
– २०७ कामरान अकमल
– २००* एम एस धोनी
– १९२ कुमार संगकारा
– १६७ दिनेश कार्तिक
– १५२ दिनेश रामदिन