मुंबई । एमएस धोनीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी विश्वचषक स्पर्धेनंतर तो क्रिकेटपासून दूर होता आणि तेव्हापासून त्याच्या भविष्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर धोनीने सैन्यासह प्रशिक्षण घेतले. दरम्यान, तो टेनिस, गोल्फ देखील खेळला. एवढेच नव्हे तर सुमारे आठ लाख किंमतीचे ट्रॅक्टरही खरेदी केले.
काही दिवसांपूर्वी धोनी शेतातही दिसला होता. आता तो सेंद्रिय शेती करणार असल्याचे बोलले जात होते. प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, धोनी सेंद्रिय शेती व शेतकर्यांसाठी मोठी पावले उचलणार आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, धोनीला शेतकर्यांना मदत करायची आहे आणि तो ‘न्यू ग्लोबल’ नावाचा एक नवीन ब्रँड आणत आहेत.
शेतकर्यांना देणार स्वस्त खत
धोनीला सुरुवातीपासूनच क्रिकेटव्यतिरिक्त देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच तो शेतकर्यांना मदत करण्याच्या विचारात आहे. धोनीला कमी किंमतीत दुर्गम भागातील शेतकर्यांना स्वस्त खते पोहचवायची आहेत. यासाठी धोनीची कंपनी राज्य सरकारांशी चर्चा करत आहे.
केवळ शेतकर्यांसाठी नव्हे, तर त्याला गरीब व हुशार मुलांनाही त्याला शिकवायचे आहे, म्हणूनच ‘ग्लोबल स्कूल’चे नियोजन केले जात आहे. तथापि, धोनी पूर्णपणे सेंद्रीय शेती करणार की शेतकर्यांना मदत करणार याची स्पष्टपणे माहिती मिळाली नाही.
लॉकडाऊन दरम्यान धोनीने 8 लाख रुपये देऊन महिंद्रा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदी केले होते. रांचीमधील धोनीचे फार्महाऊस सात एकरांवर पसरलेले आहे, त्यामध्ये त्याने एक भव्य घर तसेच बाईक, कार आणि खूप मोठे पार्क बनविले आहे. याशिवाय त्यांच्याकडे बरीच जमीन रिक्त आहे, जिथे तो शेती देखील करू शकतो.