भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने माजी कर्णधार एमएस धोनीला मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात सौरव गांगुलीपेक्षाही उत्कृष्ट कर्णधार असल्याचे सांगितले आहे. धोनीने जिंकलेल्या ट्रॉफी यामागील कारण असल्याचे गंभीरने सांगितले. तरीही गंभीरने पुढे स्पष्ट केले की धोनीला एक अनुभवी संघ मिळाला होता, जो गांगुलीने तयार केला होता.
माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा, ग्रॅमी स्मिथ, गौतम गंभीर आणि के. श्रीकांत यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान गंभीरने हे भाष्य केले.
स्टार स्पोर्ट्सचा ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमादरम्यान गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी (MS Dhoni) गांगुलीपेक्षा पुढे राहिला आहे. कारण त्याने आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकल्या आहेत.
तो म्हणाला, “धोनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गांगुलीपेक्षा (Sourav Ganguly) उत्तम कर्णधार होता. कारण जर तुम्ही केवळ ट्रॉफीची चर्चा कराल, तर टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वनडे विश्वचषक या आयसीसीच्या सर्व स्पर्धा धोनीने जिंकल्या आहेत.”
“एक कर्णधार म्हणून यापेक्षा चांगले विक्रम करणं केवळ कठीण आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील विक्रमांचा विचार करता, धोनी नक्कीच गांगुलीच्या पुढे आहे,” असेही गंभीर पुढे म्हणाला.
“जेव्हा गांगुलीकडे कर्णधारपद आले, तेव्हा त्याच्याकडे विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, आशिष नेहरा आणि मोहम्मद कैफ यांसारखे कमी अनुभव असणारे खेळाडू होते. त्यांना तयार करण्याची आवश्यकता होती. परंतू जेव्हा धोनीकडे कर्णधारपद आले, तेव्हा हे सर्व खेळाडू जागतिक स्तरावरील खेळाडू बनले होते. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद त्यांच्याकडे होती,” असेही धोनीच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना गंभीर म्हणाला.
तो पुढे म्हणाला, “धोनीला असे अनुभवी खेळाडू मिळाले, ज्यांनी गांगुलीच्या नेतृत्वात खेळण्यास सुरुवात केली होती.”
इरफान पठाणनेही (Irfan Pathan) धोनीला वनडेमध्ये गांगुलीपेक्षा अधिक चांगला कर्णधार असल्याचे सांगितले. त्याने गांगुलीला अनलकी म्हटले, जो महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धांमध्ये शेवटचा टप्पा पार करू शकला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-या व्यक्तीने भारतीय क्रिकेटची प्रतिमा जगात मलिन केली, आता…
-क्रिकेटमधील ५ असे अंपायर, जे कायमच चाहत्यांचे राहिले खास
-कोरोनामुळे अशी एक गोष्ट घडली, ज्यामुळे अँडरसन विकेट घेऊच शकत नाही