ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 15 जानेवारीला दुसरा वनडे सामना ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
या सामन्यात धोनीने 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या. त्याने या खेळीत 2 षटकार मारले तसेच कोहलीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची आणि कार्तिकबरोबर पाचव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे त्याचे अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी कौतुक केले आहे.
यात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. त्याने त्याच्या 100MB या अॅपच्या माध्यमातून धोनीच्या खेळीबद्दल आणि त्याने या सामन्यात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले आहे.
सचिन म्हणाला, ‘मंगळवारी झालेल्या सामन्यात धोनीचे योगदान चांगले होते. पहिल्या सामन्यात मला वाटते की तो लयीत नव्हता. त्याला पाहिजे तिथे त्याला चेंडूचा फटका मारता येत नव्हता आणि ही गोष्ट कोणाबरोबरही होऊ शकते. पण तो दुसऱ्या सामन्यात वेगळा विचार करुन उतरला होता. तो पहिल्या चेंडूपासूनच वेगळा खेळाडू वाटत होता.’
‘तो असा खेळाडू आहे ज्याला काही चेंडू सोडायला आवडतात, त्याला खेळपट्टीची चांगली जाण आहे. तसेच त्याला गोलंदाज कशी गोलंदाजी करणार आहे आणि सामना शेवटपर्यंत कसा घेऊन जायचा हे माहित आहे. हेच त्याने केले आहे. तो एक असा खेळाडू आहे जो एका बाजूने सामना नियंत्रित करु शकतो.’
धोनीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत पहिल्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 96 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. मात्र धीम्यागतीने ही खेळी केल्याने अनेकांनी त्याच्यावर टिका केली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात धोनीने 54 चेंडूतच नाबाद 55 धावा करत टिकाकारांना प्रतिउत्तर दिले होते.
धोनी 2018 मध्ये धावा करण्यासाठी झगडताना दिसून आला होता. पण त्याने 2019 या वर्षाची सुरुवात सलग दोन अर्धशतकी खेळी करत चांगली केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–किंग कोहलीला ‘तो’ खास विक्रम मोडण्यासाठी हव्या फक्त ६७ धावा
–मेलबर्न वनडे जिंकून टीम इंडियाला ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचण्याची संधी
–देशांतर्गत क्रिकेटचा बादशाह झाला सचिन, द्रविडसारख्या दिग्गजांच्या यादित सामील