रविवारी(४ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या हंगामातील १८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन संघात पार पडला. हा सामना चेन्नईने १० विकेट्सने जिंकत हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर चेन्नई संघाचा कर्णधार एमएस धोनी पंजाबचा कर्णधार केएल राहुलशी आणि सलामीवीर मयंक अगरवालशी चर्चा करताना दिसला. या चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरही शेअर करण्यात आला असून त्याला कॅप्शन दिले आहे की ‘खेळाचे विश्लेषण करण्यासाठी धोनीपेक्षा योग्य व्यक्ती असू शकत नाही. सामन्यानंतरच्या या चर्चा आम्हाला आवडतात.’ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धोनी राहुल आणि मयंकला मार्गदर्शन करत असल्याचे लक्षात येते.
याआधीही अनेकदा सामन्यानंतर धोनी युवा खेळाडूंशी चर्चा करताना दिसला आहे. त्यामुळे धोनीच्या या वर्तवणुकीचे अनेकदा कौतुक झाले आहे.
Can there be a better person than #MSDhoni to analyse the game. We absolutely love these post-match interactions. #Dream11IPL #KXIPvCSK pic.twitter.com/a2foU7eyGx
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
रविवारी पंजाबने चेन्नईला प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७८ धावा करत १७९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १७.४ षटकातच एकही विकेट न गमावता पूर्ण केला. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने नाबाद ८७ धावा आणि शेन वॉटसनने नाबाद ८३ धावा केल्या.
चेन्नईचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्सशी ७ ऑक्टोबरला होणार आहे. तर पंजाबचा पुढील सामना ८ ऑक्टोबरला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.