---Advertisement---

यूएईमध्ये धोनीला मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार; जडेजाचाही झाला सन्मान

On: शुक्रवार, सप्टेंबर 18, 2020 3:34 PM
---Advertisement---

मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल 2020) सुरू होण्यास आता फक्त काही तास शिल्लक आहेत. पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स व 3 वेळा आयपीएल-विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात होईल. दोन्ही संघ सामन्यासाठी तयारी करण्यात व्यस्त आहेत, परंतु दरम्यानच्या काळात चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार एमएस धोनीसह अनेक खेळाडूंचा गौरव केला आहे. आयपीएल 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना दुबईत चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने पुरस्कारांचे वितरण केले.

सन 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कार्यक्षम नेतृत्व आणि संघाच्या वतीने सर्वाधिक धावा केल्याबद्दल कर्णधार एमएस धोनी याला गौरविण्यात आले. आयपीएल 2019 मध्ये धोनीने 83.20 च्या सरासरीने 416 धावा केल्या होत्या. आयपीएल 2019 मध्ये धोनीने 23 षटकार आणि 22 चौकार ठोकले.

आयपीएल 2019 मध्ये केलेल्या शानदार कामगिरीबद्दल अष्टपैलू रवींद्र जडेजा यालाही गौरविण्यात आले. आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट डावखुरा फिरकीपटू म्हणून जडेजाला हा पुरस्कार मिळाला. जडेजाने आयपीएल 2019 मध्ये एकूण 15 बळी मिळवले होते, त्याचा इकॉनमी रेट फक्त 6.35 होता.

सलामीवीर शेन वॉटसन यालाही आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात धाडसी खेळी खेळण्याचा पुरस्कार मिळाला. शेन वॉटसनने आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात 59 चेंडूत 80 धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान वॉटसनलाही दुखापत झाली होती आणि त्याच्या पायातून रक्तस्त्राव झाला होता, परंतु असे असूनही तो क्रीजवर उभा होता.

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाजी प्रशिक्षक आणि माजी खेळाडू मायकेल हसी यांनाही गौरविण्यात आले.  मायकेल हसी चेन्नई सुपरकिंग्जशी 10 वर्षांपासून संबंधित आहे, यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.

चेन्नई सुपरकिंग्सकडून प्रथमच खेळणार्‍या साई किशोर आणि पियुष चावलाला धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी जर्सी दिली. डावखुरा फिरकीपटू साई किशोर यंदाच्या हंगामात खेळू शकतो.

टी -20 क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा पहिला गोलंदाज ड्वेन ब्राव्हो यालाही विशेष पुरस्कार देण्यात आला. ब्राव्होने त्याच्या हॉटेलच्या खोलीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात भाग घेतला. सध्या तो क्वारंटाईनमध्ये आहे.

आयपीएल 2019 मध्ये सर्वाधिक 26 बळी घेणारा इम्रान ताहिर यालाही चेन्नई सुपर किंग्जने शानदार ट्रॉफी दिली.  इम्रान ताहिरही आपला क्वारंटाइनचा कालावधी हॉटेलमध्ये घालवत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---