भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि साक्षी रावत यांच्या लग्नाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. एकदा एका मुलाखतीदरम्यान साक्षीने धोनीच्या आयुष्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा केला होता. यादरम्यान तिने हेदेखील स्विकारले, की तिला क्रिकेट कधीच आवडत नव्हते. परंतु धोनीमुळे साक्षीला क्रिकेटची ओळख झाली आणि क्रिकेटची चाहती बनवले.
साक्षीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चेन्नई सुपर किंग्जला मुलाखत दिली आणि धोनीबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. यादरम्यान साक्षीने त्या ३ गोष्टींचा खुलासा केला, ज्यामुळे ती धोनीच्या प्रेमात पडली. विशेष म्हणजे साक्षीने पदवी शिक्षणानंतर लगेच धोनीबरोबर लग्न केले होते.
धोनीमुळे पाहिले संपूर्ण जग
साक्षीबरोबर लग्न झाल्यानंतर भारतीय सघाचा माजी कर्णधार धोनीने आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आपल्या कारकिर्दीत धोनीने अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. याबद्दल सांगताना साक्षी म्हणाली, की धोनीमुळेच तिने हे जग पाहिले आहे.
ती म्हणाली, “हा एक चांगला प्रवास राहिला आहे. मी माहीमुळे सर्वकाही पाहिले. त्यापूर्वी मी कॉलेजमध्ये होते. पदवीनंतर लग्न झाले. त्याच्याबरोबर मी सर्वकाही शिकले आणि जगही पाहिले.”
साक्षीने सांगितले धोनीबरोबरचे आवडते ३ क्षण
साक्षीने मुलाखतीदरम्यान धोनीबरोबर घालवलेल्या ११ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या ३ आवडत्या क्षणांबद्दल सांगितले.
ती म्हणाली, “धोनीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणे, लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळणे आणि २८ वर्षांनंतर भारतीय संघाला २०११ साली विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात आवडते क्षण आहेत. त्यामुळे धोनीबद्दलची माझी आवड आणखी वाढली.”
विशेष म्हणजे २०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीला नोव्हेंबर २०११ मध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी मिळाली होती. त्याचबरोबर २०१८ साली धोनीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
आवडत नव्हते धोनीचे लांब केस
या मुलाखतीदरम्यान साक्षीने धोनीच्या लांब केसांबद्दलही खुलासा केला. तिने सांगितले की तिला कधीच धोनीचे लांब केस आवडत नसायचे. धोनीच्या खराब हेअरस्टाईलबद्दल सांगताना ती म्हणाली, की जेव्हा त्याने आपले लांब केस गुलाबी केले होते, तो काळ सर्वात वाईट होता.
ती म्हणाली, “सुदैवाने मी त्याला लांब केसांमध्ये पाहिले नाही. जर मी त्याला लांब केसात पाहिले असते, तर मी त्याच्याशी लग्न केले नसते. देवाचे आभार मानते, की माझी त्याचे लहान केस असताना भेट झाली. मला धोनीबद्दल फार काही माहीत नव्हते. मला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूंबद्दल माहीत होते. मला हे माहीत होते, की एक उंच व्यक्ती आहे आणि त्याचे लांब केस आहेत.”
परवेझ मुशर्रफदेखील होते धोनीच्या लांब केसांचे चाहते
विशेष म्हणजे धोनीच्या लांब केसांचे चाहते केवळ भारतातच नव्हे, तर पाकिस्तानमध्येही होते. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी देखील त्याच्या लांब केसांची प्रशंसा केली होती. पाकिस्तान दौऱ्यावर धोनी संघाबरोबर गेला होता, तेव्हा मुशर्रफ यांनी त्याच्या लांब केसांची प्रशंसा केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पंतची तुलना थेट ब्रायन लाराशी केली, म्हणाला…
शतक झळकावले नसले तरी विराट बनलाय विक्रमवीर! दोन संघांविरुद्ध ‘ही’ कामगिरी करणारा जागतील पहिला खेळाडू
यंदाच्या वर्षी बेयरस्टो ठरलाय शतकांचा सम्राट, वाचा भारताविरुद्ध खेळताना रचलाय कोणता नवा विक्रम?