क्रिकेटवेड्या भारत देशात रांचीसारख्या छोट्या शहरातून येऊन करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या एमएस धोनीचा म्हणजे आपल्या लाडक्या माहीचा ७ जुलै रोजी वाढदिवस असतो. आता धोनी धोनी धोनी अशी आरोळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमची थांबलीये ती परत कधीही न ऐकू येण्यासाठी. क्रिकेटला आपल्या देशात धर्मापेक्षाही उच्च स्थान आहे. अनेक खेळाडूंनी आपल्या लौकिकाने क्रिकेटविश्वात अढळ स्थान मिळवलंय. आताच्या नव्या पिढीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड यांचा बहरणारा काळ पाहिला अन् कपिल गावस्कर यांच्या पराक्रमाच्या अनेक दंतकथाही ऐकल्यात.
परंतु, खऱ्या अर्थाने आपण जगतोय ते युग आहे रोहित, विराट, अश्विन, जडेजा यांसारख्या क्रिकेटपटूंचे. परंतु भारतीय क्रिकेटला यशाची अनेक शिखरे एकामागून एक सर करून देणारा या नव्या युगाचा महानायक एकच तो म्हणजे एमएस धोनी. क्रिकेट विश्वातील जवळपास सर्वच विशेषणे अपुरी पडावीत अशी या खेळाडूचे दैदिप्यमान कारकिर्दी राहिली. अवघ्या पंधरा वर्षात भारतीय क्रिकेटला सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवण्याचं काम धोनीने केलं हे त्याची कारकिर्द पाहून लक्षात येतं.
धोनी युगाची सुरुवात
२००४ साली जेव्हा भारतीय संघात धोनीने पदार्पण केले, तेव्हा अनेक दिग्गज खेळाडू या संघात खेळत होते. पाकिस्तान विरुद्धची १८३ धावांची वादळी खेळी आजही आपल्याला आठवते. त्या खेळीने धोनी युगाचा आरंभ झाला. स्थिरावण्यास क्षणाचाही वेळ न घेता धोनी भारतीय संघाचा मजबूत आधारस्तंभ बनला. त्यावेळी धोनी आणि युवराज या जोडीचा खेळ पाहणं म्हणजे अवर्णनीय होतं अगदी क्रिकेट चाहत्यांसाठी जणू पर्वणीच.
२००७ टी२० विश्वचषकातून कॅप्टनकूल युगाची सुरुवात
२००७ च्या वनडे विश्वकप स्पर्धेतून पहिल्याच फेरीत गारद झाल्यावर भारतीय क्रिकेट विश्वात निराशेचे मळभ दाटून आले होते. या अंधारल्या वातावरणात एक दिपस्तंभाचा उदय झाला. धोनीकडे टी२० विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. अत्यंत नवखा असलेला हा संघ होता. या संघात सचिन, सौरव, राहुल यांपैकी एकही दिग्गज खेळत नव्हता. कुणालाही अपेक्षा नसताना या संघाने टी२०चा पहिला विश्वकप जिंकला. फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाने उत्तुंग भरारी घेतली. त्यावेळी भारताला २४ वर्षांनंतर विश्वकपची भेट देणारा ‘कॅप्टनकूल’ माही सर्वांचाच हिरो झाला. त्यावेळी तरुण-तडफदार स्टायलिश धोनीच्या आकर्षक हेअर स्टाईलचे करोडो चाहते भारतात निर्माण झाले होते.
पुढे भारतीय संघाचे नेतृत्त्व हाती घेतल्यानंतर रोहित, विराट, जडेजा अश्विन, पंड्या यांसारख्या अनेक हिऱ्यांना पैलू पाडण्याचे श्रेय धोनी नावाच्या या गारुड्याला जातय. प्रतिकूल परिस्थितीत बहारदार खेळ करण्याचे विलक्षण सामर्थ्य माहीमध्ये आहे. त्याला सर्वोत्तम फिनिशर पैकी एक मानले जाते. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांच कायम ठेवून अनेक सामने लिलया जिंकण्याचे कसब धोनीने अनेक वेळा साधलय. क्रिकेट विश्वात धोनीचा हेलिकॉप्टर शॉट अजरामर झालाय.
भारतीय संघाने २०११ चा विश्वकप जिंकावा ही तमाम करोडो भारतीयांची इच्छा होती. १९८३ च्या विश्वचषकाच्या आठवणीही पुसट होत असतानाच २०११ विश्वचषकाचे चौघडे वाजले होते. सचिन सेहवाग, गंभीर, युवराज, जहीर, हरभजन असे दर्जेदार खेळाडू असणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व धोनी करत होता. भारतीय क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिनचा हा अखेरचा विश्वचषक होता. त्यामुळे त्याला विश्वकप जिंकून द्यावा ही तमाम भारतीयांची इच्छा होती. मायदेशात खेळल्या जात असलेल्या विश्वकप स्पर्धेतील अंतिम सामना जिंकत भारतीय संघाने २ एप्रिल २०११ या दिवशी इतिहास घडवला. धोनीने लगावलेल्या विजयी षटकाराने करोडो भारतीयांना रस्त्यावर नाचायला जल्लोष करायला लावले. धोनीने आपल्या कुशल नेतृत्वाने तमाम भारतीयांचे स्वप्न पुन्हा एकदा साकार केले. संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू त्यादिवशी बघायला मिळाले. पण यशाने हुरळून न जाण्याची अविचल वृत्ती माहीमध्ये होती.
धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघ २००९ मध्ये कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला होता. २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून धोनीने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून इतिहासाने धोनीची नोंद घेतली. रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या अवलियाने यशाचे सर्व परिमाण बदलले.
भारतीय क्रिकेट संघामध्ये झुंजार वृत्ती निर्माण करण्यात धोनीचा सिंहाचा वाटा होता. प्रतिकूल परिस्थितीत जराही विचलित न होता, आपले कौशल्य पणाला लावून विजय कसा मिळवावा याचे अनेक उदाहरणे धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत घालून दिले आहेत. भारतीय क्रिकेट संघात अनेक हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम माहीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केले.
आयपीएलमध्ये धोनी हा सर्वोच्च ब्रँड आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील यशस्वी कर्णधार होण्याचा बहुमान महेंद्रसिंग धोनीने मिळवलेला आहे. आयपीएलसारख्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये धोनीने तुफान यश चेन्नई सुपर किंग या संघाला मिळवून दिले.
नव्याने भारतीय संघात दाखल झाल्यावर धोनीमध्ये प्रचंड आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता होती, त्याबद्दल अनेक कपोलकल्पित किस्सेही निर्माण झाले. परंतु जबाबदारीच्या ओझ्याने माही भारतीय संघाचा प्रेशर सोकर बनला. वयानुसार माहीने आपल्या खेळात अनेक बदल केले. या बदलांवर अनेक वेळा टीकाही झाली. परंतु माही डगमगला नाही. मोजके भाष्य करत सर्व जबाबदारी स्वतःवर घेत माहीने अनेक तरुण खेळाडूंचा खेळ बहारदार करण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत मानाचे स्थान महेंद्रसिंग धोनीला मिळालेले आहे. क्रिकेटच्या इतिहासात कुठल्याच आदर्श पुस्तकात न बसणारे तत्त्वज्ञान अमलात आणून माहीने यशश्री संपादन केली. त्याचं दिग्गज यष्टीरक्षकांमध्येही नाव घेतलं जातं. अचुक टायमिंग साधण्याचे कौशल्य माहिकडे नेहमीच होते.
भारतीय क्रिकेटला सर्वोत्तम उंचीवर नेऊन ठेवल्यावर एक समर्थ पर्याय मिळाल्यावर माहीने नेतृत्वाचा भार विराटकडे सोपवला होता. आजही तेवढ्याच ताकतीने नैसर्गिक खेळ करण्याची क्षमता माहीमध्ये निश्चितच होती. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्ट २०२० या दिवशी माहीने निवृत्ती जाहीर केली. याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धोनी पर्व संपले. भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हणजे माहीचे नेतृत्व होते. त्याचं नाव नेहमीच दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जाईल, हे नक्की.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
सहा-सात महिन्यांत भारताने पाहिलेत ५ कर्णधार, नकोशा गोष्टीचं श्रेय जात ‘या’ खेळाडूला
‘सर, मी जास्त डोकं लावत नाही’, पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पंड्याचं भारी उत्तर
आख्ख्या वनडे कारकीर्दीत एकही षटकार मारू न शकलेले ‘हे’ आहेत कमनशिबी क्रिकेटर