धोनीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांतने १४ जून २०२० रोजी आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण २ महिन्यांनंतरही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख मिळवणारा सुशांत हा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीशी संबंधित होता. धोनीच्या जीवनावर आधारित २०१६ ला प्रदर्शित झालेल्या ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांतने धोनीची भुमिका पार पाडली होती. या चित्रपटात सुशांतने केलेल्या कामाचे कौतुकही झाले होते.
हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. निर्माते फॉक्स स्टार स्टुडिओजने त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या या बायोपिकने जागतिक स्तरावर बॉक्स ऑफिसवर २०४ कोटींची कमाई केली आहे. या बायोपिकने भारतात १७५.७ कोटींची तर परदेशात २९ कोटींची कमाई केली होती.
या चित्रपटात सुशांत व्यतिरिक्त दिशा पटानी, कियारा आडवाणी, अनुपम खेर यांनी देखील काम केले होते.