एमएस धोनीने आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) अजून एकही सामना खेळलेला नाही. प्रत्येक सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात आशा निर्माण होते की धोनी कदाचित आज मैदानात उतरेल, परंतु तो अजूनही खेळताना दिसत नाहीये. धोनी पुढच्या सामन्यात खेळणार का, याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याचबरोबर सर्वांच्या नजरा रोहित शर्मावरही लागल्या आहेत, जो गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर आहे. तो आजचा सामना खेळणार का, हा देखील सध्या मोठा प्रश्न आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा आयपीएल सामना ६ मे रोजी होणार आहे. या सामन्यात सीएसकेचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होईल. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की चेन्नईचा संघ दिल्लीसाठी रवाना झाला आहे, पण धोनी त्यांच्यासोबत गेलेला नाही. तो चेन्नईतच थांबला आहे. याचाच अर्थ असा की, तो पुढच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. धोनीच्या पिंडरीला (Calf injury) दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो या हंगामात आतापर्यंत एकही सामना खेळू शकलेला नाही.
सध्या तरी धोनी खेळत नसला तरी, तो भविष्यात पुनरागमन करणार नाही असं म्हणता येणार नाही. क्रिकबजच्या एका रिपोर्टनुसार, धोनी पुढील सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. सीएसकेचा संघ सध्या गुणतालिकेत बराच खाली आहे आणि त्यांचे टॉप-४ मध्ये पोहोचण्याचे मार्ग कठीण दिसत आहेत, परंतु संघ अजून पूर्णपणे स्पर्धेतून बाहेर झालेला नाही. या हंगामात सीएसकेचे अजून पाच सामने बाकी आहेत. मात्र, त्याचे पुनरागमन नेमके कधी होईल, हे सांगणे कठीण आहे.
दुसरीकडे रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई इंडियन्सचा संघ आज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून त्यांचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी (LSG) होणार आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, रोहित आजचा सामना खेळणार की नाही, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने पूर्णपणे रोहितवरच सोडला आहे. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी रोहितने मैदानावर उतरून सुमारे एक तास सराव केल्याची बातमी आहे. रोहित शर्मा सध्या हॅमस्ट्रिंगच्या (Hamstring injury) दुखापतीचा सामना करत आहे, ज्यामुळे तो गेल्या काही सामन्यांपासून खेळलेला नाही. मुंबईचा संघही अजून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही, पण आजचा सामना हरल्यास त्यांच्या सर्व शक्यता संपतील. त्यामुळे आजचा सामना मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता रोहित शर्मा काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





