भारतासहित क्रिकेटविश्वातील सर्व संघ आगामी टी२० विश्वचषक २०२२ च्या तयारीला लागले आहेत. १६ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. तत्पूर्वी माजी भारतीय फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने भारताच्या विश्वविजेत्या कर्णधार एमएस धोनी याचा विश्वचषक जिंकण्याचा मंत्र जगजाहीर केला आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने २०११ मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता.
सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेदरम्यान प्रसारणकर्ता फॅनकोडच्या माध्यमातून ओझाने धोनीच्या (MS Dhoni) विश्वचषक विजयाच्या रणनितीचा खुलासा केला आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी धोनी खेळाडूंना अनुभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येक संधी देत असे, असे ओझाने म्हटले आहे.
ओझा (Pragyan Ojha) म्हणाला की, “मला वाटते २०११ विश्वचषकात भारतीय संघ यशस्वी होण्यामागटे सर्वात मोठे कारण हे होते की, धोनी त्या सर्वांबद्दल खूप गंभीर होता, ज्यांना विश्वचषकासाठी संघात सहभागी केले जाणाक होते. विश्वचषकात खेळणाऱ्या २५-३० खेळाडूंना या स्पर्धेत उतरण्यापूर्वी कमीत कमी ४० सामने खेळण्याची गरज होती. यामुळे वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करण्याची समज तुमच्यात निर्माण होते.”
“जर तुम्ही या स्पर्धेपूर्वी खूप धावा केल्या, परंतु तुम्हाला विभिन्न परिस्थितींचा सामना करण्याचा अनुभवच नसेल, तर याचा परिणाम विश्वचषकातील बादफेरी सामन्यांमध्ये दिसतो. विश्वचषकातील साखळी फेरी सामन्यांदरम्यान तुम्हाला या गोष्टी जाणवणार नाहीत. परंतु सर्वात महत्त्वपूर्ण खेळ बादफेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात होतो. या सामन्यांमध्ये तुम्हाला हा अनुभव कामी येतो”, असेही ओझाने म्हटले आहे.
सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. या बदलांबद्दल प्रतिक्रिया देताना ओझाने म्हटले की, “जेव्हा तुमच्याकडे जास्त खेळाडू उपलब्ध असतात, तेव्हा बरेचसे नकारात्मक पैलूही असतात. त्यामुळे जेव्हाही खेळाडूंना संधी मिळेल, तेव्हा त्या मर्यादित असतील. याउलट जेव्हा तुमच्याकडे जास्त खेळाडू उपलब्ध नसतील, तेव्हा तुम्हाला १० ते १२ सामने मिळू शकतात. परंतु सध्या भारतीय क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. कारण सध्या भारतीय संघातील स्पर्धा खूप वाढली आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणजे ‘टू इन वन’ मटेरियल! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले कौतुक
टी२० विश्वचषकासाठी खतरनाक योजना आखतायत भारताचे प्रशिक्षक, गोलंदाजांची बनवतायत फौज