इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल)मध्ये मुंबई सिटी एफसीने वर्चस्व कायम राखले. एटीके मोहन बागानला शनिवारी (14 जानेवारी) त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून मुंबई सिटीने 36 गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. लालिआंझुआला छांग्टेच्या एकमेव गोलच्या जोरावर मुंबईने 1-0 असा विजय मिळवला. मुंबई सिटी एफसीचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपा व मोहन बागानचा विशाल कैथ यांच्या बचावाचे आज कौतुक करावं तितकं कमीच होतं. मुंबईचे बरेच गोल कैशने रोखले अन्यथा आजच्या सामन्यात मोठा विजय निश्चित होता. लाचेंपानेही मोहन बागानला बरोबरी मिळवू दिली नाही.
यंदाच्या पर्वात मुंबई सिटी एफसीचा अश्वमेघ कोणालाच अडवता आलेला नाही. हिरो आयएसएल 2022-23 मध्ये आतापर्यंत एकमेव अपराजित असलेल्या मुंबई सिटीला रोखणे यजमान एटीके मोहन बागानला तसे अवघडच आहे. पण, घरच्या मैदानावर प्रतिष्ठा पणाला लागल्याने मोहन बागानने सुरुवात आक्रमक खेळानेच केली. तिसऱ्या मिनिटाला लालिआंझुआला छांग्टेने मोहन बागानच्या बचावफळीची परिक्षा घेतली. पेनल्टी बॉक्समध्ये छांग्टेने चेंडू नेला. गोलरक्षक विशाल कैथ व छांग्टेने यांच्यात वन ऑन वन परिस्थिती निर्माण झाली होती, कैथने प्रसंगावधान दाखवताना सुरेख बचाव केला. ९व्या मिनिटाला छांग्टेला ग्रेग स्टीवर्टची साथ मिळाली होती, परंतु हाही गोल रोखला. एकूणच मुंबई सिटीचे आक्रमण पाहून मोहन बागानला बॅकफूटवर जावे लागले. त्याचा फायदा 29व्या मिनिटाला मुंबईने उचलला. अल्बेर्टो नोग्युएरा याच्या पासवर छांग्टेने गोल केला अन् मुंबई सिटीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथचा बचाव अप्रतिम होता अन्यथा मुंबईने 32व्या मिनिटात 2-3 गोल सहज केले असते. पहिल्या हाफमध्ये मुंबई सिटीने निर्विवाद वर्चस्व गाजवले. मोहन बागानचा कैथ वगळता अन्य खेळाडूंनी निराश केले होते. एकंदर मुंबई सिटीने 3-4 गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या आणि कैथने तितक्याच चतुराईने त्या रोखल्याही. पण, मुंबईने एकहाती वर्चस्व गाजवले. दुसऱ्या हाफमध्ये मोहन बागानने लेन्नी रॉड्रीगेजला उतरवून डावपेच बदलले. मुंबई सिटीनेही मंदार देसाईला मैदानावर उतरवले. मुंबई सिटीने यंदाच्या पर्वात दुसऱ्या पर्वात सर्वाधिक 21 गोल केले आहेत. 51व्या मिनिटाला मोहन बागानला बरोबरीची सोपी संधी मिळाली होती, परंतु मुंबईचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपाने तो रोखला. दिमित्री पेट्राटोस मोहन बागानला बरोबरी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसला. 58व्या मिनिटाला ह्युगो बौमौसने मारलेला चेंडू लाचेंपाने आणखी एक अप्रतिम बचाव केला. ह्युगोलाही हा चेंडू कसा रोखला गेला यावर काही काळ विश्वास बसेनासा झाला. मुंबईचे सर्व 11 खेळाडू बचाव करताना दिसले अन् त्यामुळे मोहन बागानची कोंडी झाली होती.
FT: ATKMB 0⃣-1⃣ MCFC
A sensational defensive display from #TheIslanders seals the 3 points for us tonight, at the VYBK!#ATKMBMCFC #MumbaiCity #AamchiCity🔵 pic.twitter.com/efBJIwWZ2Y
— Mumbai City FC (@MumbaiCityFC) January 14, 2023
यंदाच्या पर्वात मोहन बागानने घरच्या मैदानावर 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि त्यामुळे चाहत्यांना अजूनही पुनरागमनाची अपेक्षा होती. मोहन बागानने दबाव टाकण्याचा खेळ सुरूच ठेवला होता आणि मुंबईला आक्रमणाची संधी मिळत नव्हती. 64व्या मिनिटाला मुंबई सिटीच्या बचावपटूने दिलेला बॅक पास महागात पडला असता, रॉड्रीगेज चेंडूवर गोल करण्यासाठी सज्जच होता, परंतु मोर्ताडा फॉलने योग्यवेळी चेंडूला किक मारली अन् मोहन बागानचा आणखी एक गोल होता होता राहिला. 12 कॉर्नर मिळूनही मोहन बागानला गोल करता आले नाही. 79व्या मिनिटाला मुंबई सिटीला दुसरा गोल मोहन बागानच्या गोलरक्षकाने रोखला. 5 मिनिटांच्या निर्धारित वेळेतही यजमान मोहन बागानला बरोबरीचा गोल करता आला नाही. मुंबईने हा सामना जिंकला.
निकाल : मुंबई सिटी एफसी 1 ( लालिआंझुआला छांग्टे 29 मि. ) विजयी वि. एटीके मोहन बागान 0
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: क्लीन स्वीप करण्यासाठी भारताच्या फलंदाजीत बदल अशक्य! पाहा दोन्ही संघाची संभावित प्लेईंग XI
बंगळूरूने ओडिशाला रोखले, प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम