कबड्डी क्षेत्रातून मोठी बातमी पुढे येत आहे. मुंबई शहरातील धारावीमध्ये शनिवारी (२३ जुलै) मध्यरात्री एका युवा कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या करण्यात आली आहे. हा कबड्डीपटू अवघ्या २६ वर्षांचा होता. या वृत्तानंतर कबड्डी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विमल राज नाडार असे मृत कबड्डीपटूचे नाव आहे. याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी चौकशीत आपल्या गुन्हा मान्यही केला आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमल राजने (Vimal Raj Nadar) कबड्डी खेळात (Kabaddi Player) आपला दम दाखवत नवी ओळख निर्माण केली होती. तो धारावीच्या ९० फिट रोडवर कामराज चाळीत राहायचा. याच चाळीतील त्याचे शेजारी असलेल्या २ व्यक्तींनी छोट्या विवादातून क्रिकेट स्टंप डोक्यात घालून विमल राजची हत्या केली असल्याचे समजत आहे. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
कांदळगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मृत विमल राज आणि आरोपी मालेश चितकांडी (Malesh Chitakandi) व त्याचा मित्र यांच्यात शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास छोटा वाद झाला. मालेश आणि त्याचा मित्र विमल राजच्या घराबाहेर बसून मोठमोठ्याने बोलत होते. यामुळे विमल राजची झोपमोड झाली आणि तो उठून घराबाहेर आला. घराबाहेर आल्यानंतर त्याने मालेश व त्याच्या मित्राला आपल्या घरापुढून उठून जायला सांगितले. यावरून त्यांच्यात वादाला सुरुवात झाली.”
“हा वाद इतका वाढला की, मारामारीपर्यंत पोहोचला. मात्र नातेवाईकांच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्यातील वाद मिटला व मालेश तिथून निघून गेला. पण काही मिनिटांनी तो परत आला आणि यावेळी त्याच्या हातात क्रिकेट स्टंप होता. त्याने तो स्टंप थेट विमल राजच्या डोक्यात घातला आणि तो जागीच कोसळला. जवळपास पहाटे ५ वाजेपर्यंत विमल राज जागीच पडून होता. स्थानिकांनी त्याला पाहिल्यानंतर जवळच्या सायन रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.”
“मालेश आणि विमल राज यांचे आधीपासूनच पटत नव्हते. त्यांच्यात सातत्याने खटके उडायचे”, असेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांदळगावकर यांनी सांगितले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
WIvsIND: दुुसऱ्या वनडेत कसे असेल हवामान, तर खेळपट्टीवर कोणाचे पारडे ठरणार जड; वाचा सविस्तर
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर
धवन दुसऱ्या वनडेत पूर्ण करणार अधुऱ्या शतकाची कसर? धोनी, गांगुलीच्या यादीत होणार सामील