इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हे सामने युएईमध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती, ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने तत्काळ बैठक घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ही स्पर्धा स्थगित करण्यात आली त्यावेळी २९ सामने झाले होते. त्यानंतर आता उर्वरित ३१ सामने हे दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत.
दरम्यान या स्पर्धेतील पहिलीच लढत ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे विजेते मुंबई इंडियन्स आणि ३ वेळेस आयपीएल विजेते राहिलेले चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये रंगणार आहे. तत्पूर्वी जाणून घेऊया, कशी राहिली आहे मुंबईच्या फलंदाजांची चेन्नईच्या गोलंदाजांविरुद्ध कामगिरी?
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि कायरोन पोलार्ड यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध नेहमीच जोरदार फटकेबाजी केली आहे. त्यामुळेच हे दोघे मुंबईकडून चेन्नई संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉप-२ मध्ये आहेत. रोहितने चेन्नई संघाविरुद्ध एकूण २९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २८.९२ च्या सरासरीने ७५२ धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी कायरोन पोलार्ड आहे. पोलार्डने २५ सामन्यात ३९.५७ च्या सरासरीने ५५४ धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितचा स्ट्राइक रेट १२५.५ तर पोलार्डचा १७५.३१ चा राहिला आहे.
तसेच रोहित आणि पोलार्डनंतर या यादीत मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. सूर्यकुमार यादवने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध एकूण १३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याला ३०.८८ च्या सरसरीने २७८ धावा करण्यात यश आले आहे. तर चौथ्या स्थानी दक्षिण आफ्रिका संघाचा आणि मुंबईचा सलामीवीर यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉकचा समावेश आहे. डी कॉकने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध ११ सामन्यात २५.७० च्या सरासरीने २५७ धावा केल्या आहेत.
तर आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या एकूण फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि शिखर धवन अव्वल स्थानी आहेत. विराटने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या २७ सामन्यात ४०.६८ च्या सरासरीने ८९५ धावा केल्या आहेत. तर शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध खेळलेल्या २४ सामन्यात ४३.१० च्या सरासरीने ८६२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईविरुद्ध ‘या’ तगड्या प्लेइंग Xiसह उतरेल धोनी, पाहा संभाव्य संघ
‘ब्लॉकब्लास्टर सामन्या’पूर्वी जखमी डू प्लेसिसची सरावास सुरुवात, पण मुंबईविरुद्ध खेळणार की नाही?