येत्या काही दिवसांनी यूएईमध्ये टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे, त्याआधीच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी हार्दिक पांड्याचे पितळ उघडे पाडले आहे. टी -२० विश्वचषकात त्याची निवड झाल्यापासून हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जेव्हा हार्दिक आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळला नाही, तेव्हा या चर्चेला अधिक वेग आला आणि या चर्चेने कळस तेव्हा गाठला जेव्हा हार्दिकने सामन्यांमध्ये गोलंदाजी करणे बंद केले. यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. त्यातच आता महेला जयवर्धनेने पांड्याबद्दल मोठे विधान केले आहे आणि बीसीसीआयला त्याला आता ‘योग्य उत्तर’ द्यावे लागेल.
जयवर्धने यांनी शुक्रवारी (१ ऑक्टोबर) म्हटले की, संघ हार्दिकला इंडियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी करण्यास भाग पाडत नाही कारण असे केल्यास त्याला अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे आगामी टी -२० विश्वचषकात त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये न खेळल्यानंतर, मुंबई इंडियन्सने हार्दिकला पुढील सामन्यांमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळवले होते.
भारतासाठी निवडलेल्या टी -२० विश्वचषक संघात त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आणि त्यावर मुख्य निवडकर्त्यानी सांगितले की, हार्दिक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमान येथे होणाऱ्या स्पर्धांमध्ये गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, पण आता यावर प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा हार्दिक आयपीएलमध्येच गोलंदाजी करत नाही, तेव्हा तो लगेचच विश्वचषकामध्ये गोलंदाजी कशी करू शकेल? आणि प्रश्न हा देखील आहे की जर हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नाही, मग त्याची संघात निवड का झाली?
पण, जयवर्धने असा विचार करत नाहीत आणि ते म्हणाले की, मुंबई फ्रँचायझी हार्दिकच्या संदर्भात भारतीय संघाच्या सतत संपर्कात आहे. ‘हार्दिकने बऱ्याच काळापासून गोलंदाजी केलेली नाही, त्यामुळे आम्ही हार्दिकसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहोत,” त्यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघाच्या पुढील सामन्याआधी ऑनलाइन पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले. हार्दिकबाबत आम्ही भारतीय संघ व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहोत.
ते पुढे म्हणाले, ‘तो आयपीएलमध्ये गोलंदाजी करेल की नाही, आम्ही दैनंदिन गोष्टींच्या आधारावर निर्णय घेऊ. मला वाटते की, या वेळी जर आपण त्याच्या गोलंदाजीवर अधिक भर दिला तर ते त्याच्यासाठी त्रासदायक ठरेल. २०१९ मध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर परतल्यानंतर हार्दिकने पूर्वीसारखी गोलंदाजी केली नाही.
हार्दिकने आयपीएलच्या केवळ दुसऱ्या टप्प्यातच नव्हे तर या सत्रात त्याच्या कामगिरीने खूप निराश केले आहे. फलंदाजीमध्ये हार्दिक ९ सामन्यांमध्ये १३.५७ च्या सरासरीने फक्त ९५ धावा करू शकला आहे आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ४० आहे. निश्चितच, त्याच्या गोलंदाजीसहित त्याची फलंदाजीही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय राहील.
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमी शतक झळकावल्यानंतर मंधनावर कौतुकाचा वर्षाव, या माजी क्रिकेटरने म्हटले ‘ऑफ साईडची देवी’
धोनीचं मास्टरमाईंड की आणखी काही? काय आहे सीएसकेचे सर्वात आधी प्लेऑफमध्ये पोहचण्याचं कारण; घ्या जाणून
‘तुमच्या पाठीमागे कोण कसंय…’, म्हणत सनरायझर्सच्या डगआऊटमध्येही स्थान न मिळाल्याने हळहळला वॉर्नर





