यंदाच्या आयपीएल हंगामातील 41वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (MI vs SRH) संघात खेळला गेला. ट्रेंट बोल्टच्या घातक गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) झंझावाती फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. हा एमआयचा सलग चौथा विजय आहे. हैदराबादने प्रथम केल्यानंतर 143 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने 15.4 षटकांत फक्त 3 विकेट्स गमावून सामना जिंकला. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय आहे. संघाने आता 9 सामन्यांत 5 सामने जिंकले आहेत. एमआयने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही, परंतु रोहितने आक्रमक दृष्टिकोन कायम ठेवला. पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावल्यानंतर मुंबईने 56 धावा केल्या. रोहित शर्माने 35 चेंडूत अर्धशतक झळकावले. 9 वर्षांनंतर रोहितने आयपीएलमध्ये सलग 2 अर्धशतके झळकावली.
रोहित शर्माने 46 चेंडूत 70 धावांची तुफानी खेळी केली. हिटमॅनच्या बॅटमधून 8 चौकार आणि 3 षटकार लागले. सूर्यकुमार यादव 19 चेंडूत 40 धावांवर नाबाद परतला. त्याने 5 चौकार आणि दोन षटकार मारले. विल जॅक्सने 19 चेंडूत 22 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. आता संघाचा नेट रन रेट खूपच चांगला झाला आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या एसआरएचची सुरुवात खूपच खराब झाली. ट्रॅव्हिस हेड 0, अभिषेक शर्मा 8, इशान किशन 1, नितीश कुमार रेड्डी 2 आणि अनिकेत वर्मा 12 धावा करून बाद झाले. हैदराबादने फक्त 35 धावांत 5 विकेट गमावल्या. त्यानंतर हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर यांनी जबाबदारी सांभाळली आणि संघाचा सन्मान वाचवला.
क्लासेनने 44 चेंडूत 71 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 9 चौकार आणि 2 षटकार निघाले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या मनोहरने 37 चेंडूत 43 धावांची महत्त्वाची खेळी खेळली. या दोघांमुळे हैदराबादचा स्कोअर 140च्या पुढे जाऊ शकला. मात्र, या विकेटवर या धावा पुरेशा नव्हत्या. त्यामुळे एसआरएचचा दारूण पराभव झाला.