इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दणदणीत विजय मिळवला. साखळी फेरी चांगली कामगिरी केल्यानंतरही लखनऊ सुपरजायंट्स आपल्या दुसऱ्या हंगामातही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने त्यांच्यावर एकतर्फी मात करत 81 धावांनी विजय मिळवला. यासह मुंबईला क्वालिफायर 2 चे तिकीट मिळाले. यासह मुंबई इंडियन्स आता विजेतेपदाच्या एक पाऊल आणखी जवळ आली आहे.
मुंबई इंडियन्सने या सामन्यात विजय मिळवताना क्वालिफायर 2 मध्ये स्थान पटकावले आहे. मुंबईची आतापर्यंतची प्ले ऑफ्समधील कामगिरी पाहिल्यास ते थेट विजेतेपदावर दावा सांगू शकतात. मुंबईने 2013 पासून 2020 पर्यंत सहा वेळा प्ले ऑफ्समध्ये मजल मारली होती. त्यापैकी तब्बल पाच वेळा त्यांना थेट विजेतेपद जिंकण्यात यश आले आहे. ज्यावेळी ते पहिल्या दोन क्रमांकावर साखळी फेरी समाप्त करतात त्यावेळी त्यांनी ही विजेतेपदे पटकावली आहेत. केवळ 2014 मध्ये त्यांना क्वालिफायर 2 मध्ये केकेआरकडून पराभूत व्हावे लागलेले. त्यामुळे ही कामगिरी पाहता मुंबई एलिमिनेटरमधून पुढे येत विजेतेपद जिंकणारा दुसरा संघ होण्याचा मान त्यांना मिळू शकतो. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने ही कामगिरी करून दाखवली आहे.
मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बळी गमावून 182 धावा केल्या होत्या. यामध्ये कॅमेरून ग्रीन याचे सर्वाधिक योगदान होते. त्याने 41 धावांची खेळी साकारली. त्याने सूर्यकुमार यादव (33) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 66 धावांची भागीदारी रचली होती. अखेरच्या षटकांमध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या नेहल वढेराने महत्त्वाचे योगदान दिल्याने मुंबईने ही मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाचा डाव 16.3 षटकात 101 धावांवर संपुष्टात आला. मार्कस स्टॉयनिस वगळता लखनऊचा एकही फलंदाज संघर्ष करू शकला नाही. युवा आकाश मधवालने पाच बळी मिळवत मुंबईच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले. आता क्वालिफायर दोन मध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल.
(Mumbai Indians Exceptional Records In IPL Play Offs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हुड्डाने पकडला तिलक वर्माचा खतरनाक कॅच, तरीही नवीन रागाने झाला लाल; रिऍक्शन व्हिडिओत कैद
अर्रर्र! नवीनच्या माऱ्यापुढे विस्फोटक सूर्या-ग्रीनने टेकले गुडघे, एकाच ओव्हरमध्ये मुंबईचा खेळ खल्लास